– विवेकानंद काटमोरे
वेळ सकाळी सहाची. भल्या सकाळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हडपसर येथील ग्लायडींग सेंटरवर दाखल झाले आणि जॉगिंगसाठी आलेले तरुण, मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मिसळताच एकच चर्चा सुरू झाली. आज (रविवारी)च्या साप्ताहिक सुट्टीचा मुहूर्त साधून शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ग्लायडिंग सेंटर गाठून मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवार नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने प्रचाराचे फंडे वापरत असतात. खासदार आढळराव पाटील यांनी यापूर्वीच्या निवडणुकीतही हडपसर भागात प्रचार करताना काळाची गरज ओळखून प्रचाराची यंत्रणा राबविली होती. यंदाही सकाळीच मार्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व जॉगिंग करणाऱ्या तरुणांना आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच त्यांच्यासमवेत गाजराचा रस पिऊन गप्पाही मारल्या. यावेळी त्यांच्यासमवेत उज्वला जंगले, माजी नगरसेवक विजय देशमुख, सुभाष जंगले, अमोल हरपळे, समीर तुपे, संदीप दळवी, के. टी. आरु, ऍड. सत्यजित तुपे, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, मारुती ननावरे, गणेश घुले, प्रशांत पोमण, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून रंगविले जात असले तरी खासदार आढळराव पाटील यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसत नव्हता. विजयाची खात्री असलेल्या खासदार आढळराव पाटील यांनी सकाळच्या थंड वातावरणात मुलांसमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला. इतकेच नव्हे तर भोसले गार्डन येथील संघ शाखेवर जाऊन डॉ. हेडगेवार, प. पू. गोळवळकर गुरुजी आदींच्या प्रतिमांचे पूजन केले तर मगरपट्टा सिटीतील गार्डनमध्ये जॉगिंग करणाऱ्या नागरिकांच्या गाठीभेठी घेऊन नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा मला बहुमताने निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांकडून साधेपणाचे कौतूक
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला घोरपडीचा रेल्वे उड्डाणपुलाच्या परवानगीचा प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांनी आढळराव पाटील यांचे अभिनंदन केले. हा प्रश्न केवळ तुम्हीच सोडवणार यांची आम्हाला खात्री होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर खासदार आढळराव पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे टपरीवर चहा घेतल्याचे पाहून अचंबित झालेले नागरिक त्यांच्या या साधेपणाचे कौतुक करीत होते.