पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (दि. 8) संचालक अंबर चिंचवडे बोलत असताना काही सभासदांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आमदार लक्ष्मण जगताप यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद निवळला.
पिंपरी-संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पतसंस्थेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. “”गेल्या वर्षभरात विविध लेखी प्रश्न संस्थेकडे पत्राद्वारे कळविले होते. त्यावर आजतागायत कोणतेही उत्तर दिलेले नाही. संस्थेमध्ये एकाच व्यक्तीची एकाधिकारशाही चालू आहे”, असा मुद्दा चिंचवडे यांनी मनोगतामध्ये मांडला. त्यावर काही संचालक व सभासदांनी आक्षेप घेतला वा भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार जगताप यांना त्यामध्ये मध्यस्थी करावी लागली.
चिंचवडे म्हणाले, गेली पाच वर्ष एकच व्यक्ती वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वैधानिक लेखापरीक्षण करीत आहे. त्याच संस्थेला 2019-20 साठी नेमणूक करण्यास हरकत घेतली असता माझ्या भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एका व्यक्तीच्या हुकूमशाही आणि अयोग्य कृतीविरूद्ध सनदशीर मार्गाने आवाज उठविणार आहे. पतसंस्थेचे मुख्य सल्लागार बबन झिंजुर्डे म्हणाले, संचालक मंडळ मनमानी कारभार करीत असेल तर कार्यकारी मंडळाच्या बैठकीतच बोलणे अपेक्षित आहे. एका फर्मला तीन वर्षासाठीच लेखापरीक्षणाचे काम देता येते. संबंधित फर्मला लेखापरीक्षणाचे काम देण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे चिंचवडे मांडत असलेला मुद्दा चुकीचा आहे. संचालक मंडळ एकत्रितपणे निर्णय घेते. त्यामध्ये हुकूमशाही असण्याचा प्रश्नच येत नाही.