विषय समिती सभापती निवडी लटकूनही शनिवारी पालिकेची सर्वसाधारण सभा

सातारा – जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडून हिरवा कंदिल न मिळाल्याने सातारा पालिकेच्या सभापती निवडी लटकल्या आहेत. मात्र, सर्वसाधारण सभेसाठी शनिवारी 20 जुलैचा मुहूर्त शोधण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांचा अपवाद वगळता विषय समित्यांच्या सभापतींनी 21 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला आहे. तीन आठवडे उलटल्यानंतरही सभापती निवडीच्या तारखा जिल्हा प्रशासनाकडून जाहीर न झाल्याने सातारा विकास आघाडीचे चाणक्‍य वैतागले आहेत.

अति तातडीचे या लेबलखाली जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या टेबलावर कागदोपत्री कार्यवाही पोहोचली आहे. मात्र, प्रशासकीय व्यस्ततेचा ताण आणि दौऱ्यांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप तारखा जाहीर केल्या नाहीत. मात्र, पालिकेत 36 विषयांचा अजेंडा काढून शनिवारी 20 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्‍चित झाले आहे.

फायर फायटर बाईक खरेदी, कास धरण उंची कामासाठी व प्रकल्प सल्लागार नेमणे, घंटागाडी सेवेसाठी नवीन मक्‍तेदार नेमणे, हत्ती तळ्याचे लिकेज काढणे, कास धरण परिसरात वृक्षारोपणासाठी रोपे खरेदी करणे यांसारख्या महत्वाच्या विषयांना मान्यता देण्यात येणार आहे. विषय समित्यांच्या निवडी तांत्रिक कारणाने लटकल्या. मात्र, सर्वसाधारण सभेचे घमासान शनिवारी रंगणार. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तातडीने तारीख मिळवण्यासाठी सातारा विकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)