श्रीगोंदा शहराचा कचरा डेपो प्रश्‍न पुन्हा पेटला

आंदोलकांनी नगरपालिका दणाणून सोडली : नगरपालिकेपुढे “मुक्काम पोस्ट आंदोलन’
श्रीगोंदा  – घनकचरा व्यवस्थापनांर्तगत भिंगान जवळील डंपिंग ग्राउंड ठिकाणी घनकचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही. आम्हा नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहे.घनकचरा विल्हेवाट अधिनियममध्ये असलेल्या सर्व निकषांची पूर्तता करून आम्हाला सुखाचा श्‍वास घेऊ द्या, अशी आर्त हाक देत वडवकरवस्ती, रायकरवस्ती व कचरा डेपो परिसरातील नागरिकांनी श्रीगोंदा नगरपालिकेसमोर “मुक्काम पोस्ट श्रीगोंदा नगरपरिषद’ हे आंदोलन केले.

कचरा डेपो परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत 20 शेळ्या मोकाट श्‍वानांनी मारल्या आहेत. प्लॉस्टिकचे वर्गीकरण झाल्याने स्थानिकांची शेती अडचणीत आली आहे. दुर्गंधी वाढत चालली आहे. वायू परिक्षण करण्यात येत नाही. परिसरातील भूगर्भातील पाणी तपासणी व्हावी. गांडूळ खत प्रकल्प राबविण्यात यावा. कीटक, दास व माश्‍यांच्या वाढत्या प्रमाणावर उपाययोजना कराव्यात. डेपोत मृत जनावरे टाकण्याचे बंद करावे. या मागण्यासाठी तेथील नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.

नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दादा काळे, नितीन रायकर, राजू वडवकर, संदिप भोळे, नवनाथ रायकर, भाऊसाहेब शिंदे, सोनाली रायकर, जयश्री रायकर, कल्पना रायकर, सुरेखा भोळे, शशिकला वडवकर सुरेखा वडवकर आदी ग्रामस्थांनी वेळोवेळी या मागण्यांसाठी आंदोलने केली. मात्र आश्‍वासना पलिकडे काहीच हाती लागले नाही. त्यामुळे येथील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. आंदोलन स्थळावरून महिलांसह तरुणांनी नगरपालिकेवर चांगलाच हल्लाबोल केला.
यावेळी मुख्याधिकारी विश्‍वंभर दातीर यांनी पाच दिवसात सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. नगराध्यक्षा शुभांगी पोटे व नगरसेवक, पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर
वर्षानुवर्षे याच मागणीसाठी नागरिक आंदोलने करत आहे. त्यांना तात्पुरती आश्‍वासने देऊन नगरपालिकेने त्यांची थट्टा लावली आहे, असा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्याने नगरपालिका अधिकाऱ्यांचा व पदाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करत मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची दालनातून बाहेर काढत खाली आंदोलनस्थळी मांडली.

राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना मैदानात
भिंगान जवळील कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक वर्षांपासून ते आंदोलने करीत आहे. मात्र त्यांच्या मागण्या जैसे थेच आहेत. त्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी सामाजिक संघटनासह राजकीय पक्ष ही मैदानात उतरले आहे. या आंदोलनात शिवसेना, भाजप, प्रहार संघटना, वंचित आघाडी व संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत पालिका दणाणून सोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)