चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या

मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघात उद्या मतदान
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज थांबला आहे. या टप्प्यात राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 29 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या जागांपैकी सर्वात उत्सुकतेची लढत म्हणजे मावळ. पवार कुटुंबातील तिसरी पिढी पार्थ पवार यांच्या रुपाने या निवडणुकीत आहे. त्यामुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यात देशातील 71 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात एकूण 9 राज्यांमध्ये मतदान होईल.

चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात दिग्गज नेत्यांकडून दिवसभर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये प्रचारसभा घेतली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे मावळमध्ये तळ ठोकून होते.

चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्‍चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण, मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, नंदुरबार, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

मावळमध्ये पवार कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात अजित पवार यांने पुत्र पार्थ पवार रिंगणात आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांविरोधात अभिनेते आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंनी आव्हान उभे केले आहे. तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यात तडगी फाईट होण्याची शक्‍यता आहे.

उत्तर-मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात अभिनेत्री आणि कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान उभे केले आहे. ईशान्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजप आपली जागा राखतं का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तर-मध्य मुंबईत पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा, तर उत्तर-पश्‍चिममध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर विरुद्ध कॉंग्रेसच्या संजय निरुपम यांच्यात सामना होणार आहे.
दरम्यान, चौथ्या टप्प्यात ज्या जागांवर निवडणूक होत आहे त्या सर्व मतदारसंघांवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. 2014च्या निवडणुकीत या 17 जागांपैकी 8 जागा भाजपने तर 9 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)