केरळमधील पूरस्थिती गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित 

नवी दिल्ली-केरळमध्ये हाहाकार उडवणाऱ्या पूरस्थितीला आज केंद्र सरकारने गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित केले. त्या राज्यात पूर आणि पावसाने आतापर्यंत 216 जणांचा बळी घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर त्या राज्यात 5 हजार 645 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्या छावण्यांमध्ये 7.24 लाखांहून अधिक विस्थापितांनी आश्रय घेतला आहे.

केरळमधील पूरस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, पुराची तीव्रता पाहता त्या राज्यातील स्थिती गंभीर स्वरूपाची आपत्ती असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गंभीर स्वरूपाची आपत्ती जाहीर करण्यात आल्यानंतर संबंधित राज्य सरकारला राष्ट्रीय पातळीवरून मदत पुरवली जाते. राष्ट्रीय आपत्ती सहाय्य निधीतून अतिरिक्त मदत पुरवण्याचा विचारही अशा प्रकरणात केंद्र सरकार करू शकते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 12 ऑगस्टला केरळला भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्या राज्याला 100 कोटी रूपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 ऑगस्टला केरळमधील पूरस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी 500 कोटी रूपयांची मदत जाहीर केली. याशिवाय, पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

दरम्यान, पूरस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका मांडली. एखाद्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची कुठली तरतूद नाही. केरळमधील स्थितीकडे आम्ही गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून पाहतो, असे त्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)