पूर रेषेचे खांब झाले आडवे

रेषा निश्‍चित करण्यासाठी बसविले होते खांब

पुणे – नदी पात्रात निळ्या आणि लाल पूर रेषेत होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडून या दोन्ही रेषा निश्‍चित करण्यात आल्या होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या रेषांच्या मार्किंगवर निळ्या आणि लाल रंगाचे मार्किंग असलेले खांबही बसविण्यात आले होते. मात्र, हे खांब अवघ्या सहा महिन्यांतच कोसळले असून काही ठिकाणी पूर रेषेच्या आत बांधकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे न्यायालयाने वारंवार फटकारल्यानंतर तरी महापालिका प्रशासन जागे होणार का असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नदीपात्रात होत असलेल्या अतिक्रमाणांबाबत वारंवार एनजीटी तसेच न्यायालयात तक्रारी दाखल केल्या जात आहेत. महापालिकेने चार वर्षांपूर्वी नदीपात्रात विठ्ठलवाडी ते वारजे हा रस्ता बांधला होता. या रस्त्याच्या कामाविरोधातही पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी महापालिकेने आणि पाटबंधारे विभागाने निश्‍चित केलेल्या पूररेषा वेगवेगळ्या असल्याचे समोर आले होते.

त्याची गंभीर दखल घेत पाटबंधारे विभागाने पूर रेषा निश्‍चित करून ती महापालिकेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही रेषा निश्‍चित करण्यात आली असून ती पालिकेच्या संकेतस्थळावरही आहे. या रेषेनुसार, काही महिन्यांपूर्वी या मार्किंगच्या आधारावर विठ्ठलवाडी ते राजारामपूलापर्यंत नदीपात्राच्या डाव्या बाजूला पूर रेषेचे खांब लावण्यात आले आहेत. त्यावर निळ्या तसेच लाल रंगाचे मार्किंग करण्यात आले आहे. मात्र, हे बसविलेले खांब कोलमडून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी निळ्या मार्किंग असलेल्या खांबाच्या आत बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)