बेलवाडीत रंगले तुकोबांच्या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण

– नीलकंठ मोहिते

बेलवाडी –
तेने सुखी माझे निवविले अंग ।
विठ्ठल हे जग देखियले ।।
कवतुके करूना भाकीतसे लडे।
आवडी बोबडे बोलूनिया ।।
तुका म्हणे सुख
झाले माझ्या जीवा ।
रंगलो केशवा तुझ्या रंगे ।।
ज्या हरिनामाच्या सुखाने शरीरालाच भक्तिच्या सुखाचा ओलावा लाभतो, तोच ज्ञानोबा माऊली… ज्ञानोबा माऊली’चा गगनभेदी जयघोष तर पखवाज यामधून येणारा एकसंध ताल, पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा गजर करीत धावणारे वारकरी आणि पताकावाले, हंडेवाल्या, तुळशिवाल्या भगिनी व विणेकरी टाळघण्यांच्या मुखातून येणारा एकसंध आवाज, हरिनामाचा जयजयकारात मेंढ्यांच्या प्रदक्षिणेने बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराजपालखीने गोल रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली व मानाच्या अश्‍वाने क्षणाचा विलंब न लावता तब्बल पाच परिक्रमा पूर्ण करून लाखो वैष्णवांच्या नयनांचे पारणे फिटले.

बेलवाडी गावाला गोल रिंगणाचा पहिला मान यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाने गावाला बहाल केला. सणसर-गावच्या भैरवनाथ मंदिरातील मुक्‍कामाच्या ठिकाणी मानाची आरती शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांच्या हस्ते पहाटे करण्यात आली. व पालखीतील पादुकांची महापूजा ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आली. हरिनामाचा घोष करीत, मानाच्या गोल रिंगणासाठी पालखी सोहळा बेलवाडी येथे सकाळी दाखल झाला. रिंगण सोहळा सुरू होण्याअगोदर मानाचा नगारा रिंगणस्थळी दाखल झाला. पालखी सोहळा सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी पालखी स्थळावर दाखल झाला. तद्‌नंतर पालखीसमवेत पायीवारी करणारे बाल वारकरी यांनी पखवाज वादन करण्यास सुरुवात केली. प्रथेप्रमाणे या भागातील मेंढपाळनी मेंढ्यांसह पालखी रथाला व पालखीला मानाची मेंढ्यांची प्रदक्षिणा करण्यात आली. पालखीचे स्वागत आमदार दत्तात्रय भरणे, गावचे सरपंच माणिक जामदार, उपसरपंच स्वाती पवार, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती लोकसभा अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, छत्रपती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, काखान्याचे संचालक सर्जीराव जामदार, प्रांताधिकारी हेमंत निकम, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, सागर मिसाळ, अर्जुन देखाई, शहाजी शिंदे, दिलीप इथापे, अनिल दुगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल पवार, परशुराम सांवत, ग्रामसेवक कर्चे यांनी स्वागत केले.

डोक्‍यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी वाऱ्याच्या वेगाने रिंगण सोहळ्यात प्रदक्षिणा करीत होत्या.त्यापाठोपाठ मानाचे विणेकरी यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या. झेंडेकरी धावले, पालखीच्या मुख्य विश्‍वास्तांसोबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी गोल रिंगण स्थळावर अश्‍वांसोबत प्रदक्षिणा केली. नामघोष व हरिनामाने रिंगण सोहळ्याला हरी जय दोषाचे चैतन्य निर्माण केले होते. बघता-बघता उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी वारकऱ्यांना सोबत उड्यांचे फेर धरले झिम्मा सुरू झाला. असा नयनरम्य सोहळा सुरू असताना हाताने टाळी आणि मुखाने राम नाम घेत ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करीत एका ताल सुरात बेलवाडी दुमदुमून गेली होती. यानंतर पालखी सोहळा सोबत चालणारे दोन अश्‍व रिंगण सोहळ्यात दाखल झालेल्या दोन्ही अश्‍वांना रिंगणात सोडण्यापूर्वी आमदार भरणे यांच्या हस्ते विधीवत या अश्‍वांची पूजा करून रिंगणात सोडले. काही क्षणाचाही विलंब न लावता या दोन्ही अश्‍वांनी रिंगण सोहळ्याला पाच परिक्रमा केल्या. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’चा जयघोष झाला अन्‌ लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा बेलवाडी गावातील गावकऱ्यांनी भजनी मंडळांनी भजन गात मारुती मंदिरात आणला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी जागोजागी अन्नदान केले,दुपारची न्याहारी घेऊन पालखी सोहळा लासुर्णे-जंक्‍शन-अंथुर्णे मार्गे निमगाव केतकीकडे मुक्‍कामासाठी मार्गस्थ झाला.

शर्मिला पवार यांची पालखीसोबत वाटचाल
शरयू फाउंडेशनच्या प्रमुख अध्यक्षा शर्मिला पवार यांनी पहाटेच्या प्रहरी संत तुकाराम महाराज पालखीतील पादुकांचे विधीवत पूजन केले. त्यानंतर सणसर गाव ते जाचकवस्ती फाटापर्यंत शर्मिला पवार वारकऱ्यांना समवेत हरिनामाच्या जयघोसात पायी वाटचाल केली. यावेळी वारकऱ्यांना शरयू फाउंडेशनतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.

आमदार भरणे यांची विश्‍वस्तांसमवेत फुगडी
रिंगण सोहळ्याच्या परंपरेनुसार दोन्ही अश्‍वांच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर, झिम्मा फुगडी होते. यासारखे अनेक वारकरी संप्रदायातील प्रकार खेळ खेळून आनंद व्यक्‍त केला जातो. आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील विश्‍वस्तांनी फुगडी धरली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)