अग्निशमन दलाची दिवाळी नागरिकांच्या सेवेतच

लक्ष्मीपूजन, पाडव्यादिवशी फटाक्‍यांमुळे आग लागल्याच्या घटना

भवानी पेठेत प्लॅस्टिक कारखान्याला आग लागल्याची मोठी घटना

पुणे – दिवाळी हा सर्वांचा आनंदाचा सण. फटाके उडविणे, फराळासह गोड-धोड पदार्थ खाणे, मित्र-नातेवाईकांच्या भेटी-गाठी, नवी कपडे अशा विविध प्रकारे नागरिक दिवाळी साजरी करत असतात. मात्र, या काळात आनंदावर विरजण पडू नये, यासाठी नरक चतुदर्शीपासून भाऊबीजेपर्यंत (दि.9) चार दिवस अग्निशमन दलाचे जवान डोळ्यांत तेल घालून अहोरात्र कार्यरत असतात. थोडक्‍यात, अग्निशमन दलाच्या 450 जवानांची दिवाळी नागरिकांच्या सेवेतच असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळीत बहुतांश जणांना सुट्टी असते. प्रत्येक जण कुटुंबियांसोबत आनंदात सन साजरा करत असतो. मात्र, याला अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी अपवाद असतात. नागरिकांच्या सेवेसाठी या काळात त्यांना कार्यरत राहावेच लागते. यासाठी दिवाळीत कोणीही सुट्टी घ्यायची नाही, असा त्यांच्या नियम असतो. त्यामुळे अग्निशमन दलातील प्रत्येक जवान कर्तव्यावर हजर असतो. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याला सुट्टी मिळते. गंभीर स्वरुपाची घटना घडल्यानंतर सुट्टी घेणाऱ्या जवानाला तातडीने कर्तव्यावर किंवा “कॉल’वर (आग लागते ते घटनास्थळ) हजर व्हावे लागते. दिवाळीचा सण अग्निशमन दलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. पावसाळा आणि दिवाळीत जवानांवर जादा ताण असतो, असे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.

दिवाळी सुरू होण्यापूर्वी अग्निशमन दलाकडून तयारी सुरू केली जाते. या काळात अधिकाधिक वाहने म्हणजेच बंब उपलब्ध करावे लागतात. समजा एखादा बंब किंवा यंत्रणा नादुरुस्त असेल, तर ती दिवाळीपूर्वीच दुरुस्त करून घ्यावी लागते. पुणे अग्निशमन दलाचे शहरातील वेगवेगळ्या भागात चौदा केंद्र आहेत. तेथील अधिकारी, तेथील यंत्रणेची माहिती घ्यावी लागते. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यानंतर तातडीने काय उपाययोजना करता येईल, याचा आढावा बैठकीत घेण्यात येतो. भवानी पेठेत मुख्य अग्निशमन केंद्र आहे. तेथील बिनतारी संदेश यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवावी लागते. नियंत्रण कक्षातील कामकाज सुरळीत चालले असल्याची खातरजमा करावी लागते. शहर तसेच उपनगरातील प्रत्येक केंद्रातील पाण्याच्या टाक्‍या पूर्णपणे भरल्या जातील, याची काळजी घेतली जाते. एका वेळी अनेक ठिकाणी आग लागली तर त्याचे नियोजन आणि मनुष्यबळ कसे उपलब्ध करून द्यायचे याचाही आढावा घेतला जातो. अग्निशमन दलात अधिकारी तसेच जवान मिळून साडेचारशेजणांचे मनुष्यबळ आहे, असे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांत 17 कॉल

लक्ष्मीपूजनानंतर फटाक्‍यांची आतषबाजी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशीच फटाक्‍यामुळे आग लागल्याच्या घटना घडतात. पाडव्यादिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडविले जातात. लक्ष्मीपूजन आणि पाडवा दोन्ही दिवसांत फटाक्‍याने आग लागल्याचे शहरात 17 कॉल होते. याशिवाय भवानी पेठेत प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग लागल्याची घटना होती, अशी माहिती पुणे महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)