चाकणचा अंतिम विकास आराखडा दहा दिवसांत

डॉ. नीलम पाटील : नागरिकांच्या सूचना, हरकती मागविण्याचा निर्णय

चाकण – सुमारे साडेतीन-चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले आणि आगामी काळातील नियोजनबद्ध विकासासाठी काही सरकारी व खासगी जागांवर विविध आरक्षणे टाकून चाकण शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येऊन हा प्रारूप विकास आराखडा चाकण नगरपरिषदेच्या विशेष सभेत नुकताच सादर करण्यात आला.

यानंतर सभेच्या काही सूचना हरकती घेतल्या नंतर दिनांक 21 जुलैपूर्वी अंतिम हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून त्या आराखड्यावर नागरिकांच्या सूचना, हरकती, एक महिन्याच्या कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती चाकण नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी दिली.

चाकणचा प्रारूप विकास आराखडा नगररचना विभागाचे अधिकारी विजय शेंडे यांनी नगरपरिषदेच्या विशेष सभेत सादर केला. या विकास आराखड्यावर विशेष सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आदींनी सूचना व हरकती मांडल्या. या आराखड्यात सरकारी जागा तसेच व्यक्तींच्या खासगी मालकीच्या जागा आदींवर विविध विकासकामे, प्रकल्प, रस्ते आदींसाठी आरक्षित करण्यात आली आहेत, तसेच मूलभूत सुविधांसाठी पाण्याची टाकी, कचरा प्रकल्प, लहान व मोठ्या मुलांसाठी खेळाचे मैदान, नाना-नानी उद्यान, जलशुद्धीकरण केंद्र, हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम दफनभूमी, भाजी मंडई, रस्ता, वाहनतळ, माता आरोग्य केंद्र, आदीं व इतर प्रकल्पांसाठी चाकण शहराच्या विविध ठिकाणी सरकारी जागांवर व खासगी जागेवर आरक्षण ठेवण्यात आली आहेत.

या विशेष सभेला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक राजेंद्र गोरे, किशोर शेवकरी, नीलेश गोरे, मंगल गोरे, पूजा कड, प्रवीण गोरे, धीरज मुटके, सुजाता मंडलिक, हुमा शेख आदी शिवसेनेचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. तर हा प्रारूप आराखडा करताना विरोधी पक्षातील नगरसेवकांना विश्‍वासात घेतले नाही, असा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता बिरदवडे व अपक्ष नगरसेवक सुदाम शेवकरी हे उपस्थित होते.

एकात्मिक विकास आराखाडा करणेबाबत चाकण नगरपरिषद हद्दवाढ रिट याचिका 9760/2019 अन्वये परवानगी घेऊन प्रक्रिया व्हावी, जेणेकरून जनतेच्या पैशाची दुहेरी प्रक्रियेवर उधळपट्टी होणार नाही. नमूद वस्तुस्थिती सत्य असून 5 जुलै 2019 च्या विशेष सभेवर नगरपरिषदेचा भ्रष्ट व दिशाहीन कारभार, महिला अधिकारी अपमान, उच्च न्यायालय याचिका, जनतेच्या पैशांची दुहेरी प्रक्रियेवर उधळपट्टी, संशयास्पद विकास आराखाडा नगरपरिषदेकडे येण्यापूर्वीच फुटलेला असून, सदोष आहे. ही चर्चा शहरभर असून या कारणाने सत्ताधारी व प्रशासन यांच्यावर अविश्‍वास निर्माण झाल्याने आम्ही सामूहिक बहिष्कार व निषेध नोंदवत आहोत, तसेच या पत्राची नोंद सभेच्या इतिवृत्तांत देखील घ्यावी.
– जीवन सोनवणे, विरोधी पक्षनेता चाकण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)