विरोधात लढलो, त्याचाच प्रचार आता जीवावर -सत्यजित तांबे

 आघाडीचा धर्म पाळणार, नगर निवडणूक प्रतिष्ठेची

पुणे: ज्याच्या विरोधात लढलो त्याचा प्रचार करण्याची वेळ लोकसभा निवडणुकीत माझ्यावर आली आहे. अशावेळी नगरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणे माझ्या किती जीवावर येत असेल अशा शब्दांत युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्‍त केली.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त बैठक आज पुण्यात झाली. त्यावेळी तांबे बोलत होते. यावेळी युवक राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शेकापच्या चित्रलेखा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड उपस्थित होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित तांबे व संग्राम जगताप यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी जगताप यांनी तांबेंचा पराभव केला होता. त्यानंतर तांबे नगरला फिरकले नाही.

या बैठकीत त्यांनी व्यक्‍त केलेल्या वक्तव्यांवरुन 2014 मध्ये झालेला पराभव अजूनही त्यांच्या किती जिव्हारी लागला असल्याचे दिसून आले. तांबे म्हणाले, ज्यांच्या विरोधात मी विधानसभा लढलो आता त्यांचा प्रचार करणे माझ्या जीवावर आले असले तरीही आम्ही आघाडीचा धर्म पाळणार आहोत. दक्षिण नगर लोकसभेची लढत ही महाराष्ट्रातल्या सर्वांत प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. यात राष्ट्रवादीच्या जगताप यांच्यासमोर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे भाजपमध्ये गेलेले चिरंजीव डॉ. सुजय विखे यांचे आव्हान आहे. अशावेळी तांबे यांचे हे वक्तव्य आश्‍चर्यकारक मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)