तोफखाना पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात
नगर – दारूच्या नशेत घरात झालेल्या भांडणातून पित्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून केला. शहरातील तपोवन रोड परिसरात रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी शुक्रवार (दि.12) रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चिराग सोहम कुमावत (वय-1) असे मयत मुलाचे नाव आहे. आरोपी सोहन परशुराम कुमावत (रा. पंचमुखी बालाजी मंदिर मु.पो. ता. पुलेरा, जि. जयपूर. ह. रा. गजसंस्कृतीनगर आपार्टमेंट, दुसरा मजाला, गुंड गोडाऊनजवळ तपोवन रोड) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिराग याचे वडील सोहम कुमावत व आई अर्चना कुमावत हे तपोवन रोड परिसरात राहतात. ते मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. नगर शहरात फरशी बसवण्याचे काम करीत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते नगरमध्ये वास्तव्य करतात. सोहम कुमावत याला दारूचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री उशिरा तो दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळेस पत्नी अर्चना हिच्यासोबत त्याचे भांडण झाले. या भांडणात त्याने रागाच्या भरात पत्नी व मुलाला मारहाण सुरू केली. मुलाला बऱ्याच वेळा उचलून जमिनीवर आपटले व गळा दाबला असे फिर्यादीत म्हटले आहे. चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे समजताच तिने रुग्णालयात हंबरडा फोडला. याप्रकरणी पहाटेच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्चना कुमावत हीने पती विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.