जालना – उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काही जण पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत. जालन्यात एक भूमिका आणि औरंगाबादमध्ये दुसरी, असे चालणार नाही. सत्तार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भोकरदन येथे विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, जालना लोकसभेची उमेदवारी देताना सत्तार यांना विश्वासात घेतले होते, नव्हे तर त्यांना स्वत:लाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही. आता विषय संपला आहे. मी त्यांना पक्षातून काढत आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सत्तार यांनी सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळू नये म्हणून विशेष प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असल्याचेही म्हटले होते.