अकरावीची प्रवेश प्रक्रिया रेंगाळली

प्रवेश अर्ज भरण्यासाठी वेटिंग : वेळापत्रकच जाहीर न झाल्याने पालकांत संभ्रम

पिंपरी – दहावीचा “ऑनलाईन’ निकाल लागल्यानंतर दहावी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची व पालकांची अकरावी प्रवेशाची घाई सुरु झाली आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरवात झाली असली तरी अद्याप प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकच जाहीर न झाल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग भरण्यास दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर सुरुवात झाली आहे. आता प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग भरण्यास सुरूवात होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. अर्जाचे भाग 1 व 2 भरून ते ऑनलाइन जमा करायचे आहे.

विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाचा अर्जाचा पहिला भाग वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी भरायचा आहे. त्यामुळे सध्या बहुतांश विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 भरुन ठेवला आहे. अर्ज भरताना प्रवेश अर्जामध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या अर्जामध्ये 10 महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. विशेषत: पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयाचे नाव टाकताना अत्यंत काळजीपूर्वक टाकावे.

पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय विद्यार्थ्यास मिळाल्यास त्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्याने तिथे प्रवेश न घेतल्यास त्याचा अर्ज प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार आहे. त्यामुळे, सध्या आकरावी प्रवेश पक्रियेचा अर्ज भरताना विद्यार्थी व पालक अत्यंत काळजी घेत आहे. ऑनलाईन निकाल लागून आता दोन दिवसाचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे दुसरा भाग केव्हा भरता येणार याची प्रतीक्षा पालक करीत आहेत.

अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा दुसरा भागाचे ऑनलाइन वेळापत्रका अद्याप जाहीर झालेले नसल्याने सध्या विद्यार्थी व पालक हे वेळापत्रक केव्हा जाहीर होणार याची प्रतिक्षा करीत आहेत. प्रत्यक्षात दहावीचे निकालपत्र विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यानंतरच दुसऱ्या भागाचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भाग 2 भरण्यासाठी पुढील वेळापत्रक अजून जाहीर झाले नाही. मात्र, या प्रक्रियेला उशीर होत असल्याने प्रवेश घेण्यासाठी रेंगाळावे लागत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)