थकबाकीदारांनी लढवली संचालकपदाची निवडणूक

नारायणगावात विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभासदांकडून कारवाई करण्याची मागणी

नारायणगाव – हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे थकबाकीदार असतानाही संचालकपदासाठी निवडणूक लढविली. त्यानंतर विद्यमान चेअरमन व संचालक हे थकबाकीदार असल्याची काही सभासदांनी लेखी तक्रार केल्यानंतर जुन्नर सहाय्यक निबंधकांनी संबंधित सोसायटीच्या तत्कालिन सचिवांना 22 जुलै 2019 ला उपस्थित राहून कागदपत्रे घेऊन पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

31 मार्च 2015 ते 31 मार्च 2019 या सोसायटीचे संचालक थकबाकीदार असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला पीक कर्जासाठी चुकीचा माहिती देऊन बॅंकेची व संस्थेची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे, अशी लेखी तक्रार 25 जून 2019 रोजी विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद एकनाथ कुंडलिक, दिलीप भोर, भगवान रणदिवे, सुरेश शिंदे, जगन खोकराळे, बाबाजी भोर, रवींद्र खोकराळे, संदीप भोर यांसह 60 सभासदांनी जुन्नर सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे.

तक्रार अर्जात म्हटले आहे की, कोणताही सभासद हा थकबाकीदार असल्यास तो त्या संस्थेच्या निवडणुकीस अपात्र असतो, हा नियम धाब्यावर बसवून संस्थेचे तत्कालीन सचिव यांनी थकबाकीदार नसल्याचे खोटे दाखले दिले. त्या खोट्या दाखल्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती निवडणूक लढल्या आणि निवडून देखील आल्या.

हिवरे तर्फे नारायणगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या 22 फेब्रुवारी 2015 ला झालेल्या निवडणुकीत सन्मित्र पॅनेल आणि कुलस्वामी खंडेराय पॅनेल या दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत कुलस्वामी खंडेराय पॅनेल विजयी झाले होते. 7 मार्च 2015 ला या संस्थेच्या चेअरमनपदाची निवड झाली. थकबाकीदार असताना देखील संचालक मंडळाने संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे तरी देखील सचिवांनी या संचालक मंडळावर कोणतीही कारवाई केली नाही.

उपलब्ध दप्तराची पाहणी
सहाय्यक निबंधक कार्यालयांकडून 28 जूनला दिलेल्या पत्रानुसार संस्थेच्या उपलब्ध दप्तराची पाहणी केली असता प्रथम दर्शनी तक्रारीत तथ्य दिसत असल्याने 22 जुलै 2019 ला तत्कालीन सचिव यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे घेऊन उपस्थित राहून लेखी,तोंडी म्हणणे सादर करावे असे आदेश दिले आहेत. यावेळी मधू यशवंत वायकर हे या सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहत होते.

कायदा काय सांगतो?
संचालक मंडळ 22 फेब्रुवारी 2015 ला झालेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर चेअरमन व काही संचालक 31 मार्च 2015 पर्यंत थकबाकीदार दिसत आहेत, तर काही संचालक 2014-15, 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 या आर्थिक वर्षात पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज, गायी गोठा कर्ज, रूपांतर कर्ज यापैकी कोणत्या ना कोणत्या कर्जाचे सोसायटीच्या खतावणीवरून थकबाकीदार दिसत आहेत. मार्चअखेर कोणताही संचालक थकबाकीदार असेल, तर तो संचालकपदावर राहण्यास अपात्र ठरतो, असा कायदा आहे.

सोसायटीच्या खतावणी नुसार चेअरमन व काही संचालक हे 31 मार्च 2015 ला थकबाकीदार व काही संचालक सन 2016, 2017, 2018 ला थकबाकीदार दिसत असतानाही ते संचालक कसे झाले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेनेही या थकीत संचालकांना पीक कर्ज कोणत्या निकषानुसार दिले तसेच सचिव यांनी पदाचा गैरवापर केला असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
– एकनाथ कुंडलिक, सोसायटीचे सभासद व तक्रारदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)