निवडणुकीची हवा मोदींच्या विरोधात

रघुनाथदादा पाटील : कॉंग्रेस-भाजप नष्ट झाल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस नाहीत

अकोले  – सध्याच्या निवडणुकीमध्ये देशात व राज्यात मोदींच्या विरोधात हवा वाहते आहे, असे सांगून शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी कॉंग्रेस व भाजप नष्ट झाल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्‍यता नाही. भाजप व कॉंग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून कॉर्पोरेट पैशामुळेच हे मोठे पक्ष टिकून आहेत. नकली देशप्रेम बाजूला सारून शेतकरी उद्‌ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्ती बाजूला सारल्या गेल्या तरच देशातील शेतकऱ्यांना स्वास्थ्य लाभेल असा निर्वाळा त्यांनी दिला.

शेतकरी संघटनेचे नेते झुंबरराव आरोटे यांच्या पत्नी व अगस्तीचे संचालक अशोकराव आरोटे यांच्या मातोश्री भिमाबाई यांचे निधन झाल्याचे वृत्त कळाल्यानंतर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (दि.25) मेहेंदुरी (ता. अकोले) येथे येऊन आरोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले, तेव्हा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, वंचित आघाडी ही भाजपचीच भूमिका बजावत असून आम्ही रस्त्यावरील, संसदेतील व न्यायालयीन लढाई लढत आहोत. तर वंचित आघाडीला हाताला धरून भाजप हिंदू व आघाडी अल्पसंख्यांक, मागास, दलित कार्ड चालवून जातीयवादाचे विष देशात पेरीत आहे. जय-पराजयापेक्षा कॉंग्रेस भाजप व त्यांचे पुरस्कृत उमेदवार पराभूत करण्यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत.

न्यायालयीन, संसदीय व रस्त्यावरील लढाईला शेतकरी संघटना प्राधान्य देत असून लोक पक्ष व भूमिका बदलत असले तरी शेतकरी संघटना मात्र शेतकऱ्यांचे हित कायम जपणार आहे. शेतकरी संघटना फोडण्याला राज्यकर्त्यांनी कायम प्राधान्य दिले आहे. अनिल गोटे, शंकरअण्णा धोंडगे, पाशा पटेल, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत या व अन्य राज्यकर्त्यांनी संघटनेचे कार्यकर्ते फोडले आणि संघटनेची चौकट विस्कळीत केली. मात्र शेतकरी संघटनेला दोष देताना प्रसारमाध्यमांनी फोड तोड करणाऱ्यांनाही तितकेच दोषी ठरवले पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी शेतकरी आत्महत्याबाबत संसदेत श्रद्धांजली ठराव पारित होत नाही याबाबत खेद व्यक्त केला.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, विदर्भ विभाग प्रमुख दिनकर दाभाडे, जिल्हाध्यक्ष अशोक पठारे, भास्करराव तूवर, हनुमंत चाटे (बीड), मनोज हेलवडे (श्रीरामपूर), शब्बीर भाई शेख (सांगली), शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद देशमुख, शिवाजी आरोटे, भागवत आरोटे, सुनील मालुंजकर, चंद्रकांत आरोटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित आघाडी बजावतेय भाजपची भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)