नवी दिल्ली – सांप्रदायिक टीका केल्याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना आज निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बिहारमधील बेगुसराई जिल्ह्यामध्ये २४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका सभेस संबोधित करताना मुस्लिम धर्मियांविरोधी वक्तव्य केलं होतं. या सभेला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील उपस्थिती लावली होती. गिरीराज सिंह यांच्या या वक्तव्यानंतर बेगुसराई जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली होती.
दरम्यान, आज निवडणूक आयोगाने देखील गिरीराज सिंह यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस धाडले असून त्यांच्यावर आदर्श आचारसंहिता व सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक प्रचारसंबंधीच्या निर्देशांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील गिरीराज सिंह यांच्यावर सांप्रदायिक टीका केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने बिहार व झारखंडमध्ये प्रचारबंदीची कारवाई केली होती.