कामगार कायदा काय सांगतो ?
कोणत्याही श्रमिकाने केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्याला रोख स्वरुपात रक्कम दिली पाहिजे. तसेच त्याला दिला जाणारा कामाचा मोबदला दर महिन्याच्या एक ते 10 तारखेच्या आत रोख स्वरुपात अदा करणे आवश्यक आहे. याशिवाय श्रमिकाला त्याच्या कामाच्या मोबदल्यात कोणतीही वस्तू देता येणार नाही, असे करणे कामगार कायद्याचा भंग असणार आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन एकाच दिवशी केले जात नाही. प्रभाग कार्यालयानुसार यामध्ये दिवस बदलले जात आहेत. पगाराच्या तारखा बदलत असल्यामुळे या कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एक तारेखला पगार होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी गृह, वाहन व इतर कर्जांचे हफ्ते निश्चित करुन घेतले आहे. परंतु आता पगाराच्या तारखा बदलत असल्याने कर्मचाऱ्यांची दर महिन्याला तारांबळ होत आहे. सर्व प्रभागांमधील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन एकाच दिवशी करण्याचे नियोजन करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर वर्ग चारमध्ये सुमारे दोन हजार कर्मचारी कायमस्वरुपी कार्यरत आहेत. प्रभागानुसार वर्ग एक ते चार अशी वर्गवारीनुसार या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून वेतन अदा केले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बॅंक खात्यामध्ये हे वेतन जमा केले जाते. वर्ग एक ते तीनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला बॅंक खात्यात जमा केले जाते. मात्र, प्रभागानुसार वेतनाच्या दिवसात समानता नसल्याने या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांशी सर्वच कर्मचाऱ्यांनी वाहन, गृह अथवा अन्य कोणत्या का होईना कारणासाठी कर्ज काढलेले आहे. वेतनाचा दिवस निश्चित नसल्याने या कर्जाचे हप्ते वेळेवर जाण्यास अडचण निर्माण होत आहे. बदलीनंतर प्रभाग कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीचा फटका या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेतली असता, प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी, वेतनशीट तयार करणे, बॅंकेला पाठविणे ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून विलंब होत असल्याची बाब समोर आली आहे. सध्यातरी बहुतांशी कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर असल्याने, हे कारण पुढे केले जात आहे. मध्यंतरी सफाई कर्मचारी काम योग्य प्रकारे करताहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य अधिकारी सरप्राईज व्हिजिट देऊन, तपासणी करणार होते. यामध्ये दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. याशिवाय नागपूर कनेक्शनच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन, सफाई कर्मचाऱ्यांना डिजिटल घड्याळे देऊन, त्यांच्या कामावर वॉच ठेवला जाणार होता. मात्र, प्रशासनाचा हा प्रस्ताव फेटाळल्याने ही बाब तात्पुरती का होईना टळली आहे.
पिंपरी-चिंचवडला बेस्ट सिटीचा बहुमान मिळवून देण्यात सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, हा घटक महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे. कामगार कायद्यानुसार काम करताना बंधनकारक असणाऱ्या बाबींकडेदेखील दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब कामगार कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. ही बाब केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
ऍड. सागर चरण, उपाध्यक्ष, आरोग्य विभाग, तक्रार निवारण समिती