उदयनराजे भोसलेंकडून प्रेक्षक गॅलरीची पाहणी, क्रीडा समितीवर खेळाडूंना नेमण्याची सूचना
सातारा – साताऱ्याचे क्रीडा संकुल असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी व क्रिकेटचे मैदान तसेच ऍथलेटिक ट्रॅक्सकरिता जुनी इमारत पाडायची वेळ आली तर पाडा, अशा स्पष्ट सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना केल्या. जिल्हा क्रीडा संकुल समितीवर प्रत्येक क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींना नेमा, नियमात नसेल तर तरतूद करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या. जिल्हा क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदान व ऍथलेटिक ट्रॅक्सची बुधवारी उदयनराजे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या.
यावेळी इर्शाद बागवान, मनोज कान्हेरे, सुनील काटकर, रॉबर्ट मोझेस, जितेंद्र खानविलकर उपस्थित होते. काही व्यक्तींनी एकत्र येउन सातारा पालिकेच्या ताब्यातील शाहू स्टेडियम क्रीडा संकुलाच्या नावाखाली व्यापारी संकुल तयार केल,े अशा कानपिचक्या देत उदयनराजे म्हणाले, “”कोणत्याच खेळाडूंना मैदानाचा मनसोक्त वापर करता येत नाही. क्रीडा संकुल नोंदणीकृत संस्था आहे. येथे कोणाचाही एककल्ली कारभार चालणार नाही. क्रीडा समितीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना ठेवून क्रीडा प्रसारासाठी किती उपयोग झाला? त्याऐवजी क्रीडापट्टूंना या समितीत स्थान मिळायला हवे. तशी तरतूद नियमात नसेल तर ती तरतूद करा.” प्रेक्षा गॅलरीच्या बांधकामावरही त्यांनी आक्षेप घेतला.
गॅलरीच्या बांधकामाबाबत आम्ही विचारणा करायला गेलो तर आमच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल झाला. प्रेक्षागॅलरीची व्यवस्था जमिनीपर्यंत केली जावी म्हणजे स्टेडियममध्ये आयपीएल अथवा आयोजित रणजी सामन्यांचा आनंद सातारकरांना घेता येइल. वाईचे अफजल पठाण व साताऱ्याचे महेश कारंजकर यांच्यानंतर साताऱ्यात तिसरा रणजीपट्टू तयार झाला नाही. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची जवाबदारी आपली आहे. साताऱ्याचे क्रीडा संकुल असून अडचण नसून खोळंबा आहे. स्टेडियममध्ये अद्ययावत ट्रॅक, क्रिकेट मैदान करण्यासाठी भले जुनी इमारत पाडा, शेजारची जागा संपादन करा त्यासाठी लागेल ते सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. उदयनराजे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन नकाशा ड्रॉईंगची पाहणी केली.