कर्डिलेंवरील साशंकतेचे सावट दूर

अनिल देशपांडे
राहुरी – आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून या विधानसभा निवडणुकीकडे बघितले गेले. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे आता खासदार झाले. अपेक्षेप्रमाणे त्यांना राहुरी मतदारसंघात सत्तर हजाराचे मताधिक्‍य मिळाले.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या पुढील राजकीय वाटचालीस यामुळे सुकरता येणार आहे.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निवडणूक भुमिकेवरील साशंकतेचे सावट या मोठ्या मताधिक्‍याने निश्‍चितच दूर होईलच. त्यांचे पक्षातील वजन या मताधिक्‍याने व निवडणुकीतील त्यांचे भूमिकेने निश्‍चितच वाढेल.

खरे तर विरोधकांची तयारीतील त्रुटींवर या मताधिक्‍याने अधिक प्रकाश टाकला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच नाव आणि काम हेच निवडणुकीत भाजपचे मुख्य भांडवल होते. उमेदवारांचे चेहरे हा भाग तुलनेत गौणच होता. मोदींच्या भव्य प्रतिमेपुढे अधिक ठळकपणे लक्षात आले, ते विरोधकांच्या प्रतिमेचे दारिद्रयपण. जेवढे सुक्ष्म पातळीवर नियोजन भाजपने केलेले होते. तेवढे नियोजन विरोधी पातळीवर दिसले नाही.

प्रचारात जीएसटी, नोटाबंदी, शेतकरी विरोधी धोरणे, बेरोजगारी आदी प्रश्‍नांची चर्चा होईल, असे अपेक्षित होते. विरोधी उमेदवारांचे खरे तर ते भांडवल ठरायला हवे होते. राष्ट्रवादीच्या प्रचारात ते मुद्दे आले, मात्र ते मतदारांना भावलेच नाहीत. या मुद्दयांचा आधीच वापर झालेला होता. त्यामुळेच ते प्रभावी ठरले नाही. उलट सर्जिकल स्ट्राईक, आतंकवाद, स्थिर सरकार, मजबूत सरकार, निर्णय घेणारे तत्पर, कार्यक्षम सरकार आदी मुद्दे प्रचारात प्रभावी ठरले. “चौकीदार चोर है’ या नकारात्मक प्रचाराला “मै हू चौकीदार’ असा कौशल्याने वापर करीत मोंदीनी बाजू पलटवली.

“मै हू चौकीदार’ अधिक प्रभावी ठरला. संग्राम जगताप यांची उमेदवारी उशीरा जाहीर झाली. या उलट डॉ. सुजय विखेंची तयारी फार आधीपासूनच होती. आमदार शिवाजी कर्डिलेंच्या भूमिकेला विशेष महत्व होते. डॉ.सुजय विखेंना भाजपत प्रवेश देवून उमेदवारी देण्यात आमदार कर्डिले किंगमेकर होते. तरीही आमदार व त्यांचे जावई संग्राम जगताप यांना खासदार करण्यात ते किंगमेकरची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. माझ्या भूमिकेवर निकालापर्यंत साशंकतेचे ढग असले तरी प्रत्यक्ष निवडणूक निकालच माझी भूमिका स्पष्ट करतील, असे आमदार कर्डिलेंनी स्पष्ट केले होते.नाते संबधापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझेवरील विश्‍वास सार्थ ठरविणे हेच मला प्राधान्याचे आहे, असे कर्डिलेंनी वारंवार स्पष्ट केले होते.

स्थानिक प्रश्‍नांचा निवडणूक प्रचारात महत्व कमीच होते. पण विखेंनी ते महत्व देखील लक्षात घेतले. डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम यशस्वी केला. उस उत्पादकांच्या देय रक्कमा त्यांनी निवडणुकीपूर्वीच खात्यात जमा केल्या. अन्य काही पूर्वीची देणी होती. ती ही दिली. या सर्वांचा सकारात्मक परिणाम डॉ. सुजय विखेंचे मताधिक्‍य वाढण्यात झाला.

राहुरी मतदारसंघाने दिलेले मताधिक्क सहाही विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आहे. जेवढी तयारी डॉ. सुजय विखेंची होती. त्या तुलनेने आमदार संग्राम जगताप यांना खूपच कमी कालावधी मिळाला. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे संघटन हाच काय तो त्यांचा आधार होता. आमदार शिवाजी कर्डिंलेचे काही कार्यकर्ते आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर होते. याचा अर्थ आमदार कर्डिलेंनीच त्यांना तसे करावयास सांगितले आहे. ते देखील आतून सहकार्य करतील, असे सांगितले गेले. वास्तवात तसे झाली नाही. परिणामी विखेंचा वारु सुसाट सुटला.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तुलनेने फरक आहेच. पण तीही निवडणूक प्रतिमांचीच लढाई आहे. ती वैयक्तिक पातळीवर जशी उमेदवारांच्या प्रतिमांची ठरणार आहे. तशीच ती मध्ये नरेंद्र मोंदीच्या प्रतिमेच्या जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम आणि नाम यांची यात भर पडणार आहे. विरोधकांनी आता या लढतीत कोणाच्या प्रतिमेचा आधार घ्यायचा हा यक्ष प्रश्‍नच आहे.तालुक्‍यात आता भाजपची ताकद वाढली आहे. कॉंग्रेसचा विखे गट आता भाजपचा गट झाला आहे. ती ताकद ही आमदार कर्डिलेंची जमेची बाजू असेल. तर राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे त्यांचे समोरील आव्हानांचा कसा मुकाबला करतात. याचे सुक्ष्म पातळीवर ते कसे नियोजन करतात हे बघावे लागेल.त्यांना बरीच तयारी करावी लागेल हे विखेंच्या सत्तर हजार मताधिक्‍याने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)