वेरूळमधील घृष्णेश्वर मंदिराच्या 112 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता 

वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्‍यातील वेरुळ येथे असलेल्या श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिराच्या 112 कोटी 41 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा आराखडा शिखर समितीच्या मान्यतेने नियोजन विभागामार्फत राबविण्यात येईल, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर हे महत्वाचे ज्योतिर्लिंग असून या तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी विकास आराखडा सादर केला होता. त्यास मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने 7 मार्च 2018 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 9 ऑगस्ट 2018 रोजीच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी हे या आराखड्यातील कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या आराखड्यातील काही कामास तांत्रिक मान्यता देताना स्थानिक परिस्थितीनुसार त्यात अंशत: काही बदल किंवा सुधारणा करण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती करण्यात आली आहे.

आराखड्यातील कामे दोन टप्प्यात 31 मार्च 2020 पर्यंत पूर्ण करावयाची आहेत.आराखड्यातील ज्या कामांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे तिथे अश मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आराखड्यातील कामांसाठी आवश्‍यकतेनुसार सल्लागारांची नियुक्ती करता येईल. आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती देवस्थान संस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात येणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पर्यटक आणि भाविकांच्या सुविधांचा समावेश 
आराखड्यात सुंदर वास्तुशिल्प असलेले प्रवेशद्वार, ऐतिहासिक पाश्वभूमीची माहिती देणारी संरक्षण भिंत, वाहनतळ सुविधा, पोलीस मदत केंद्र, पर्यटक स्वागत कक्ष, कार्यालय, उपहारगृह, हस्तकलेच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी दुकाने, बेल व फूल विक्री करणारी दुकाने, नियंत्रण कक्ष, चप्पल-बूट स्टॅण्ड, डीजिटल लॉकर रुम, श्री.क्षेत्र घृष्णेश्वर देवस्थान संस्थान कार्यालय, आरोग्य कक्ष, लहान मुलांसाठी काळजी कक्ष, स्वच्छतागृहे, तिकिट कक्ष, भक्त निवास, होमकुंड, व्हीआयपी कक्ष, बस स्टॅण्ड, त्रिशूळ, डमरू, दीपमाळा, नंदी, 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती, दगडी पाथवे, अंतर्गत रस्ते, दर्शन रांग, भुयारी मार्ग, येळगंगा नदीवर दर्शन रांगेसाठी पूल बांधणे, पोलीसांकरिता वॉच टॉवर उभारणे ही आणि अशी इतर अनेक कामे या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. अशी माहिती ही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)