पर्यटनस्थळांच्या विकासामुळे तरुणांना रोजगार मिळेल

पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांचे मत; मांजरसुंबा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन
नगर – छोट्या मोठ्या देवस्थांनचा विकास झाला तर पर्यटनास चालना मिळेल. गावचा, तालुक्‍याचा, जिल्ह्याचा यामुळे विकास होईल. या मध्यमातून गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. महाराष्ट्र हा पर्यटनाचा खजिना आहे. येथील पर्यटनस्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. परंतु दुर्दैवाने गेल्या 50-60 वर्षात राज्याच्या पर्यटन क्षेत्राला न्याय मिळाला नाही. गेल्या अडीच वर्षांपासून या खात्याचे मंत्रीपद मिळाल्यानंतर पर्यटन क्षेत्राचा अभ्यास करुन विकासाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राला पर्यटनदृष्ट्‌या देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा या सरकारचा व आपला मानस असल्याचे प्रतिपादन पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा येथील विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण मंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डिले होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समिती सभापती विलासराव शिंदे, बाजीराव गवारे, रेवणनाथ चोभे, संदीप कर्डिले, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाळासाहेब निमसे, संतोष म्हस्के, बन्सी कराळे, संभाजी पवार, राजेंद्र भिंगारदिवे, गोरक्षनाथ देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव कदम, सरपंच तुकाराम आव्हाड, कैलास पटारे, मांजरसुंब्याचे सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच पांडुरंग कदम, विजय शेवाळे, तुकाराम कदम, जयराम कदम, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री रावल पुढे म्हणाले, आमदार हे त्यांच्या मतदारसंघाचे वकील असतात. त्यांनी मतदारसंघातील विकासकामांची बाजू सरकारकडे कशा पद्धतीने मांडली त्यावर त्या मतदारसंघाचा विकास अवलंबून असतो. आमदार शिवाजीराव कर्डिले हे ज्येष्ठ आमदार आहेत. जनसामान्यातील लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी गेल्या 25 वर्षात शासनाच्या विविध योजनांमधून मतदारसंघाचा कायापालट केला असल्याचे गौरवोद्गारही यावेळी मंत्री रावल यांनी काढले.

मांजरसुंबा गावाने शासनाच्या विविध योजनांमधून विकास साधत अनेक पुरस्कार मिळविले आहेत. या गावात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध कामे केली जातील असेही त्यांनी सांगितले. आ. कर्डिले यावेळी म्हणाले, मंत्री रावल यांनी पर्यटन विभागाच्या मंत्री पदाला न्याय दिला आहे. त्यांनी नगर जिल्ह्याला सर्वाधिक 100 कोटी रुपये निधी मिळवून दिला. या भाजपा सरकारच्या काळात नगर-राहुरी मतदारसंघात सर्वाधिक निधी मिळाला असून त्याद्वारे विविध विकासकामे झाली आहेत. आता काम कुठे करायचे ही शोधण्याची वेळ आली आहे.

एवढी कामे गेल्या पाच वर्षात झाली आहेत. मांजरसुंबा हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. लवकरच नगर शहरासह जिल्हाभरातील नागरिक मांजरसुंबा गावाला पर्यटनस्थळ म्हणून भेट देतील असेही ते म्हणाले. गोरक्षनाथ गडावर (मांजरसुंबा) भक्तीनिवास बांधकाम, पुरुष-महिला शौचालय, तलावाभोवती जिन्याचे बांधकाम, संरक्षण भिंत, वाहनतळासाठी पेव्हींग ब्लॉक, बागबगिचा व वृक्षारोपण व गोशाळेची सुधारणा अशा प्रकारच्या विकास कामांचे भूमीपूजन पर्यटक विकास मंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सरपंच जालिंदर कदम यांनी केले. कार्यकमासाठी मांजरसुंबा सह परिसरातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)