महागाई आणि बेरोजगारीने पाकिस्तान बेजार
कराची: पाकिस्तान सध्या महागाई आणि बेरोजगारीने बेजार झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर, पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून हटवण्याचा निर्धार माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते असणाऱ्या झरदारी यांनी सिंध प्रांतातील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्ये बोलताना त्यांनी इम्रान यांच्यावर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान म्हणून इम्रान यांना पाकिस्तानी जनतेवर जबरदस्तीने लादण्यात आले आहे. त्यांच्या सरकारने जनतेचे रोजगार हिरावून त्यांच्यावर महागाईची त्सुनामी लादली. पाकिस्तानमधील बेरोजगारी आणि महागाईचे प्रमाण 500 टक्क्यांनी वाढले आहे.
इम्रान यांना लवकरात लवकर सत्तेवरून हटवले नाही तर ते पाकिस्तानची दुर्दशा करून टाकतील. त्यामुळे आम्हालाही देश चालवणे मुश्किल बनेल. आम्हाला सत्तेची भूक नाही. मात्र, इम्रान सरकारला सत्तेवरून खाली खेचणे गरजेचे आहे. अन्यथा, पाकिस्तानमधील बहुतांश जनतेचे जीवन आणखी यातनामय बनेल, असे झरदारी म्हणाले. लवकरच इम्रान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इरादाही त्यांनी जाहीर केला.