पोलीस दलात खळबळ; उपाधीक्षकाची महिला पीएसआयकडे लैंगिक सुखाची मागणी

सातारा पोलीस अधीक्षकांनीही मारहाण केल्याचा आरोप

पुणे – “पाटण (जि.सातारा) विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांना एका विनयभंग प्रकरणातील गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासंदर्भात कागदपत्रांवर सही करण्यासाठी भेटण्यास गेले असता, त्यांनी शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच गुन्ह्यातील आरोपींसोबत तडजोड करुन पैसे न दिल्याने शिवीगाळ केली,’ असा खळबळजनक आरोप पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच “सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे याप्रकरणी दाद मागितली असता, त्यांनीही जातीवाचक शिवीगाळ करत केनने (पट्टी) फटके मारुन केबीनबाहेर काढले,’असा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

यासंदर्भात शिंदे म्हणाल्या, “माझी नेमणूक पाटण पोलीस उपनिरीक्षक पदावर झाल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये अंगद जाधवर व पाटण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उत्तम भापकर यांनी संगनमत करुन अधिकाराचा दुरुपयोग करत माझा मानसिक, शारिरिक व आर्थिक छळ केला आहे. एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात हजर करण्यासाठी छाननी अहवालावर स्वाक्षरी घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग यांच्याकार्यालयात गेले होते. त्यावेळी जाधवर यांनी मला प्रश्‍न विचारला की, “सदर गुन्ह्यातील आरोपीकडून किती रुपयांची तडजोड झाली व त्यातील माझा हिस्सा मला आज देणे अपेक्षित आहे.’ त्यावर “मी कोणाकडूनही एक रुपया घेतला नसल्याने मी पैसे कोठून ठेवू,’ असे सांगितले. यावर जाधवर यांनी अतिशय अश्‍लिल भाषेत खरडपट्टी काढली. तसेच “तू बघ आता मी तुझी काय हालत करतो?’ अशी धमकीही दिली. याप्रकरणी “मी तत्कालिन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनी विशाखा समितीकडे प्रकरण दिल्यानंतर समितीच्या चौकशीत अंगद जाधवर यांनी अपशब्द वापरल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांच्याविरोधात कोणती कारवाई न करता माझी बदली सातारा नियंत्रण कक्षात करण्यात आली.’

सातारा पोलीस अधीक्षक पदावर तेजस्विनी सातपुते रुजू झाल्याने, त्यांच्याकडे “पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विरोधात लेखी तक्रारीची दखल घ्यावी,’ अशी मागणी करण्यासाठी गेले होते. पण, त्यांनी माझी तक्रार ऐकून न घेता उलट “तुच अश्‍लिल चाळे केले असणार, तुला घरी कसे बसवायचे, काय रिपोर्ट बनवायचा असे मला माहित आहे’ असे म्हणत, टेबलावरील केन उचलून सपासप तीन-चार फटके मारुन धक्के मारुन मला केबिनबाहेर काढले. सदर दोषी अधिकाऱ्यांवर ऍट्रोसिटी, विनयभंग व अधिकाराचा दुरुपयोग कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी माझी मागणी आहे.

संबंधित प्रकरणाचा अहवाल मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे. यासंदर्भातील कागदपत्रेच खरे बोलतील, यामुळे मी वेगळी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.
– तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सातारा.

ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याची नसती तत्परता
दीपाली शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच पुणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकाने संबंधित महिला अधिकाऱ्याविरुद्ध व्हॉट्‌स ऍपवर पोस्ट टाकून त्यांची बातमी प्रसिद्ध न करण्याची विनंती केली. तसेच त्यांना सस्पेंड केल्याचे पत्रही तत्परतेने टाकले. मात्र, या पत्रावर हाताने 27 तारीख लिहली होती. दीपाली शिदे यांनी मात्र त्यांच्या “एम-ऍप’वर 31 मार्चपर्यंत त्यांना दिलेल्या ड्युटीचे वेळापत्रकच दाखले. यामुळे पत्रकार परिषद घेतल्याने तातडीने जुनी तारीख दाखवून सस्पेंड केल्याचे पत्र काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षकाने कोणाच्या आदेशाने हे उद्योग केले? हे मात्र समजू शकले नाही. दीपाली या आठ वर्षे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)