मंचर – आषाढ महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. आखाडात देवाच्या नवसपूर्तीसाठी गावठी कोंबडा कापतात. त्यामुळे आखाड महिन्यात गावठी कोंबडा भाव खाऊ लागला आहे.
गावठी कोंबडा आणि कोंबडी मिळण्याचे प्रमाण दुर्मिळ झाल्यामुळे सध्या गावठी कोंबडयाला 600 ते 700 रुपये बाजारभाव आणि कोंबडीला 350 ते 400 रुपये बाजारभाव मिळत असल्याचे ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे मालक इसाक शेख यांनी सांगितले. आषाढमध्ये गावठी कोंबडयाला मागणी जास्त असल्यामुळे गावठी कोंबडा मिळणे दुरापास्त झाल्याने त्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आखाड पार्टी साजरी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. पंढरपूर एकादशी यात्रा पार पडल्यानंतर जोरदार उठाव होऊन गावठी कोंबडा गटारी अमावस्याच्या शेवटच्या टप्प्यात 700 ते 800 रुपयांपर्यंत गावठी कोंबड्याचे बाजारभाव कडाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉयलर कोंबडीला फारसा उठाव नसला तरी किरकोळ विक्रेते150 ते 180 रुपये किलो बाजारभाव असल्याचे सांगण्यात आले.