साताऱ्याच्या दिल्ली दरवाजाची पालिकेकडून उपेक्षाच

सातारा – उदयनराजे भोसले यांना खासदारकीसाठी लकी चार्म ठरलेला साताऱ्याचा दिल्ली दरवाजा उपेक्षेच्या गर्तेत सापडला आहे. हा दिल्ली दरवाजा म्हणजे सातारा पालिकेचे उत्तराभिमुखी प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांची पिकदाणी झाली आहे. पिचकाऱ्यांचे लाल रंग, उखडलेले पेव्हर, जिन्याचे वाकलेले बार यामुळे या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे. दिल्ली दरवाजाला झळाळी आणि उदयनराजे यांची खासदारकीची हॅटट्रिक याची चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे.

साताऱ्याच्या दिल्ली दरवाजाची कहानी अत्यंत मनोरंजक आहे. नगरविकासाची दूरदृष्टी ठेवणारे नगररचना व बांधकाम विभाग साताऱ्यात नावालाच आहे. अभियांत्रिकीचा कोणताच संबंध नसणारे शातारा पालिकेचे निवृत्त अधिकारी अनिल भोसले यांनी स्वतः पाठपुरावा करून पालिकेच्या उत्तराभिमुखी प्रवेशद्वाराचे डिझाईन बनवले. मात्र या प्रवेशद्वारावर श्रेयवादाचे राजकारणच फार रंगले. तत्कालीन मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी यांनी भोसले यांचे संकल्पक हे नाव टाकण्यासाठी राजकीय दबावातही कोनशिला बदलायला लावली होती. मनोमिलनाच्या काळात उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे उद्‌घाटन झाले.

या उद्‌घाटन सोहळ्यात कॉम्रेड किरण माने यांनी भाषणामध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाडा उत्तराभिमुखी बांधून दिल्लीचे तख्त काबीज केले असा वाड्याच्या दिल्ली दरवाजाचा संदर्भ दिला होता. तसाच योगायोग साताऱ्यात घडावा आणि या पालिका प्रवेशद्वाराच्या उदघाटनानंतर उदयनराजे यांना खासदारकी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि घडले ही तसेच प्रवेशद्वार उद्‌घाटनानंतर उदयनराजे यांची भूमाता गौरव दिंडीचा राजकीय फार्स सुपरहिट ठरला आणि राजेंनी विक्रमी मतांनी 2009 मध्ये पहिल्यांदा दिल्ली गाठली. तेव्हापासून सातारा पालिकेच्या नव्या प्रवेशद्वाराला गंमतीने दिल्ली दरवाजा म्हणले जाते. मात्र उदयनराजेंसाठी लकी ठरलेले हे प्रवेशद्वार पिचकारी मारणाऱ्यांचे आवडते ठिकाण झाले आहे.

काही निर्लज्ज महाभागांनी चक्क कोनशिलेवर पिचकाऱ्या मारल्या आहेत. जिन्याच्या पायऱ्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. बऱ्याच ठिकाणचे पेव्हर उखडले असून जिन्याचे बार चक्क वाकले आहेत. या प्रवेशद्वाराची चक्क रया गेली असून या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकातही कोणतीही तरतूद करण्यात आली नाही.

सातारा पालिकेत सध्या टक्केवारीचा बाजार आणि बेपत्ता इंजिनिअर हा विषय प्रचंड गाजतो आहे. राजकीय आडोशाने ओव्हरटेंडरिंगचा खेळ नियोजनबद्ध पध्दतीने सुरू आहे. अगदी रस्ते विकास अनुदानाचा निधी उपलब्ध नसतानाही राजवाडा परिसरात डांबरीकरणाचा घाट बांधकाम विभागाने घातला आहे. या घोटाळ्यांमध्ये प्रत्यक्षात गरजेच्या विकास कामांना कोठेच संधी नाही. साताऱ्याच्या दिल्ली दरवाजाच्या दुर्देवाचे दशावतार थांबवणे हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असताना येथे टक्केवारीची आंधळी कोशिंबिर सुरू आहे. तीन महिन्यापूर्वी या विषयाचा प्रस्ताव देण्याचा प्रयत्न स्थायी समितीत झाला होता मात्र तिथेही राजकारणात तो विषयं हाणून पाडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)