पार्थ नव्हे अजित पवारांचा पराभव – बारणे

पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार नव्हे, तर अजित पवार यांचा पराभव झाला आहे. मावळातील मावळ्यांनी पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मावळातील नागरिकांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला थारा दिला नाही,’ अशी प्रतिक्रिया मावळचे विजयी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.

बालवोडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांची मतमोजणी सुरू होती. दरम्यान, या मतमोजणी केंद्रात विजय दृष्टिक्षेपात आल्यानंतर शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा आणि घराणेशाहीविषयी मतदारांच्या मनात असलेला प्रचंड राग मतदानातून व्यक्त झाला असून मावळची जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचार आणि अजित पवार यांच्या पैशांची ताकद यांचा हा पराभव आहे. पार्थ हे मावळावर लादलेले उमेदवार होते. ते मतदारांना मान्य नव्हते. त्यामुळे मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शेतकरी कामगार पक्षाचा हा पराभव आहे. हा विजय मावळातील मतदारांचा आहे, असेही बारणे यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्वास तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात व विकासपुरुष म्हणून मतदारांनी दाखविलेला विश्वास, सर्व आमदार व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यांचा हा विजय आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here