“ब्रेक्‍झिट’बाबतचा निर्णय आता सरकार नाही, तर खासदारच घेणार 

ब्रिटीश खासदारांनी कनिष्ठ सभागृहाचा ताबा घेतला

लंडन – ब्रिटनच्या संसदेमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांना सोमवारी रात्री आणखी एक मोठा धक्का बसला. “ब्रेक्‍झिट’बाबतचा निर्णय सरकारने घेऊ नये, तर खासदारांनी बहुमताने घ्यावा यासाठीच्या दुरुस्ती प्रस्तावावर झालेल्या मतदानामध्ये सरकारचा पराभव झाला. या मुद्दयावर 329 विरुद्ध 302 मतांनी थेरेसा मे सरकारचा पराभव झाल्यामुळे आता “ब्रेक्‍झिट’बाबतचा निर्णय खासदारच बहुमताने घेणार आहेत. एकाअर्थी खासदारांनी कनिष्ठ सभागृहच ताब्यात घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्व पक्षातील खासदरांनी पक्षभेद विसरून सरकार च्या विरोधात मतदान केल्यामुळे थेरेसा मे यांच्यासाठी हा पराभव अधिक त्रासदायक ठरला आहे. थेरेसा मे यांना विरोध करणाऱ्यांमध्ये त्यांच्या सरकारमधील तीन मंत्र्यांचाही समावेश आहे. थेरेसा मे यांनी संसदेमध्ये मांडलेले “ब्रेक्‍झिट’च्या आराखाडायाबाबतचे विधेयक यापूर्वी दोन वेळेस संसदेमध्ये नामंजूर झाले आहे.

संसदेतील घडमोडींनंतरही थेरेसा मे आशावादी असून बहुमताने “ब्रेक्‍झिट’बाबतचा निर्णय होणार नाही. सरकारचा मसुदा हाच योग्य पर्याय असू शकतो. संसदेमध्ये उद्या होणाऱ्या मतदानानंतर कोणत्याही एका पर्यायाच्या अवलंबासाठी बहुमताने निर्णय होणे अवघड आहे, असे त्या म्हणल्या. या मतदानानंतर “कोणत्याही पर्यायाविना’ “ब्रेक्‍झिट’ची स्थिती येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ब्रिटनने 12 एप्रिलपूर्वी जर खासदारांनी कराराला मंजुरी दिली नाही तर कराराशिवाय ब्रिटनला युरोपियन संघामधून बाहेर पडावे लागणार आहे. तर दुसरीकडे कलम 50 रद्द करून “ब्रेक्‍झिट’ रद्द करावे, या मागणीसाठी दाखल झालेल्या ऑनलाईन याचिकेवर 40 लाख लोकांनी स्वाक्षरी केली आहे.

पुन्हा सार्वमत घेण्यासाठी लोक रस्त्यावर

ब्रेक्‍झिटवर पुन्हा एकदा मतदान घ्यावं, या मागणीसाठी ब्रिटनच्या संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चात जवळपास 10 लाख लोकांनी भाग घेतला. गुरुवारी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावरही राजीनामा देण्याचा दबाव आहे. या मोर्चात सहभागी झालेल्यांमध्ये मजूर पक्षाचे उपाध्यक्ष टॉम वॉटसन, स्कॉटलंडचे मंत्री निकोला स्टरजिऑन, लंडनचे महापौर सादिक खान, अपक्ष आमदार ऍना सौबरी, माजी महाधिवक्ते डॉमिनिक ग्रिव्ह इत्यादी नेते सहभागी झाले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)