‘या’ कारणामुळे युतीचा निर्णय; उद्धव ठाकरेंचा खुलासा 

संग्रहित छायाचित्र

मुंबई : २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीने महाराष्ट्रामध्ये मोठे यश मिळवले होते. लोकसभा जागांच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेने ‘युती’च्या बाजूने कौल देत भाजपचे २३ तर शिवसेनेचे १८ खासदार लोकसभेवर निवडून दिले. लोकसभा निवडणुकांनंतर मात्र शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये कटुता निर्माण झाली, याचाच परिणाम म्हणून या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देखील स्वबळावर लढवल्या. तब्ब्ल साडेचार वर्ष सत्तेत असून देखील दोन्ही पक्ष एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसले. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी स्वबळाच्या तलवारी म्यानात ठेऊन पुन्हा एकदा हात मिळवले आहेत.

दरम्यान आज मातोश्रीवर शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती करण्यामागच्या खऱ्या कारणाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “भाजप नेतृत्वाकडून त्यांच्या मित्रपक्षांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमध्ये सुधारणा झाली असून आता भाजप पक्षनेतृत्व मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देत आहेत. यामुळेच मी ही युती करण्याचा निर्णय घेतला आहे.”

-Ads-

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये शिवसेनेने भाजपचा ‘ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री’ हा प्रस्ताव देखील धुडकावून लावला असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार अशी भूमिका मांडल्याचे देखील सांगितले.

“भाजपसोबत युती शिवसेनेच्या अटींवर झाली असल्याने पहिली लढाई तर शिवसेनेने जिंकली आहे आता निवडणुकांच्या मुख्य लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.” असं आवाहन त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं.

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)