बंगळूरु : कर्नाटकातील सत्तासंघर्षावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण आज बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावापूर्वी कर्नाटकमधील कॉंग्रेस- जेडीएस आघाडी सरकारचे भवितव्य अधांतरी आहे. बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक ठरावाला उपस्थित राहणे बंधनकारक करता येणार नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी सत्तारूढ आघाडीपुढे पुरेसे संख्याबळ जमवणे आव्हानात्मक आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे बंडखोर आमदार बी. सी. पाटील यांनी स्वागत केले आहे. आम्ही जो काही निर्णय घेतला आहे त्याबाबत आम्ही सर्व ठाम असून, आम्ही एकत्र आहोत असे पाटील यांनी चित्रफितीमधील संदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजीनामे मागे घेण्याचा प्रश्नच नाही तसेच विश्वासदर्शक ठरावाला जाण्याचा प्रश्न नाही असे त्यांनी सांगितले.