माझ्यावरील गुन्हे हा राजकीय विरोधकांचा कट- बांदल

शिक्रापूर – माझ्या विरोधात कुणीतरी बारा बारा वर्षांनंतर फसवणुकीची तक्रारी करते आणि माझा कुठेच काहीही संबंध नसताना माझ्यावर गुन्हे दाखल होतात. हा प्रकार म्हणजे संपूर्णपणे पक्षांतर्गत आणि अन्य पक्षातील राजकीय विरोधकांनी घडवून आणलेला कट आहे असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रहिवासी असलेले जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गेल्या दहा दिवसांत शिरूर व शिक्रापूर या दोन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. यापूर्वी शिरुर येथे 8 जुलै रोजी एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे तर पुन्हा 15 जुलै रोजी रात्री शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. दोन्ही प्रकरणांत माझा कुठेही थेट संबंध नाही. तसेच ज्यांनी माझ्या विरोधात फसवणूकीच्या तक्रारी दाखल केल्यात. त्या सर्वांच्या विरोधात मी लवकरच न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे बांदल यांनी सांगितले.

मंगलदास बांदल म्हणाले की, संबंधितांना फसवणूक झाल्याचे दहा ते बारा वर्षांनी लक्षात येते आणि एवढ्या वर्षांनी तक्रार दाखल करून घेऊन पोलीस माझ्यावर गुन्हा दाखल करतात. या दोन्ही व्यवहारांमध्ये माझा कागदोपत्री काहीही संबंध नाही. तसेच दोन्ही खरेदीखत हे दुय्यम निबंधक येथे रितसर झालेले आहेत. त्याशिवाय ते खरेदीखत कायदेशीर होत नाही. या दोन्ही तक्रारदार व्यक्तींशी माझा काहीही संबंध नसूनदेखील माझ्यावर गुन्हा दाखल होतो हे हास्यास्पद आहे. विरोधकांचे हे कट कारस्थान मी सन 2005पासून अनुभवत आहे. यापूर्वी शिक्रापूर ग्रामपंचायतचा सरपंच, बाजार समिती, जिल्हा परिषदेचा सभापती तसेच विविध निवडणूका मी लढवून मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात झंजावती प्रचारदौरा करुन उमेदवार निवडून आणले आहेत. हे विरोधकांना टोचत आहे. तसेच सध्या मी व माझी पत्नी आम्ही दोघेही जिल्ह्यातील दोन आणि शहरातील एका मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रमुख दावेदार आहोत. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना पराभव चाखावा लागला, त्या सगळ्यांचेच हे कट कारस्थान आहे.

केवळ सीबीआयचीच चौकशी बाकी
माझ्या विरोधात यापूर्वी आयकर, ईडी आदींच्या चौकशा झाल्या आणि त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे माझा संबंध नसतानाही दाखल गुन्ह्यांमुळे माझी तडीपारी होईल वगैरे ज्यांना वाटत असेल तर, त्यांनी तसेच स्वप्नात राहावे. सगळं करुन झालंय त्यामुळे आता माझ्याविरोधात थेट सीबीआयचीच चौकशी बाकी आहे. त्यामुळे विरोधकांनी माझ्या विरोधात सीबीआयचीच चौकशी लावावी असे मंगलदास बांदल यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)