चंदनापुरी घाटात जाळ्यांसह दरड कोसळली

नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत

संगमनेर  – संगमनेर तालुक्‍यात सुरु असलेल्या पावसामुळे पुणे – नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात रविवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. सुदैवाने ही दरड छोटी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. सुरक्षा उपाय म्हणून दरडींना संरक्षक जाळ्या बसवूनदेखील दरडी कोसळत असल्याने महामार्गावरील प्रवास सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर तालुक्‍यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. शनिवारी व रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे रविवारी दुपारी चंदनापुरी घाटातील संभाव्य दरडी कोसळण्याच्या जागी प्रतिबंधात्मक बसवलेली जाळी तुटून लहान दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरड बाजूला केली. यांनतर नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दरड हटविण्याच्या कामादरम्यान नाशिककडे जाणारी वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती.

तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये सिन्नर-खेड महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. जुन्या महामार्गावरील चंदनापुरी घाटाला अनेक धोकादायक वळणे असल्याने रस्त्याचे चौपदरीकरण करताना नव्याने डोंगर फोडून अनेक धोकादायक वळणे काढण्यात आली. ज्या-ज्या भागात डोंगर फोडण्यात आले. तेथे मोठ्या प्रमाणात सुरुंगाचा’ वापर केल्याने अशा बहुतेक डोंगरांना तडे गेले आहेत. त्यामुळे महामार्ग सुरु झाल्यानंतर पावसाळ्यात दरडी कोसळू लागल्याने संबंधित कंपनीने संभाव्य दरडी कोसळण्याच्या जागी प्रतिबंधात्मक जाळ्या बसविल्या.

गेल्या दोन वर्षात अपवाद वगळता दरड कोसळण्याची घटना घडली नाही. मात्र सध्या सुरु असलेल्या भीज पावसामुळे डोंगरांना पडलेल्या भेगांमध्ये पाणी शिरुन काही ठिकाणी जाळ्यांसह भले मोठे दगड रस्त्यांच्या बाजूला येऊन कोसळले आहेत. त्यामुळे संपूर्ण डोंगराला लावलेली जाळी कमकुवत झाल्याने मोठ्या दरडी कोसळून एखादी दुर्देवी घटना घडण्याची शक्‍यताही वाढली आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि रहदारीच्या या मार्गावर अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित कंपनीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरड प्रतिबंधक जाळ्या बसविताना रस्ते विकास महामंडळाने आयआयटी, पवई, मुंबई यांच्या सल्ल्यानुसार दरड प्रवण क्षेत्रात प्रतिबंधक उपाययोजनांची आखणी करून, त्यानुसार जाळ्या बसवाव्यात अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)