मोक्का प्रकरण : गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा आरोपीने केलेला दावा न्यायालयाने फेटाळला

पुणे – महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) प्रकरणात अटकेत असलेल्याने अल्पवयीन असल्याचा केलेला दावा न्यायालयाने फेटाळला. मोक्काचे विशेष न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी हा आदेश दिला आहे. तो आरोपी शिकलेल्या शाळेचा दाखला, बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडण्यासाठी त्याने दिलेला अर्ज, त्यासोबतची कागदपत्रे आणि तो ज्या रुग्णालयात जन्मला, त्या रुग्णालयाच्या डॉक्‍टरचा दाखला, अशी महत्वाची कागदपत्रे मोक्काचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयात सादर केली. ती सुनावणीत महत्त्वाची ठरली.

बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड (वय 19, रा. हिंगणे मळा, आळकुंटे वस्ती, हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर शहर आणि जिल्ह्यात मिळून पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात लक्कडसिंग शितलसिंग दुधाणी (वय 30, रा. रामटेकडी, हडपसर), अर्जूनसिंग रजपुतसिंग दुधाणी (वय 42, रा. मांजरी), शितलसिंग दयासिंग दुउधाणी (वय 50, रा. लोणावळा), किरणसिंग शितलसिंग दुधाणी (वय 30, रा. लोणावळा), रजनीकौर जोगिंदरसिंग भोंड (वय 40, रा. हिंगणे मळा, हडपसर) आणि करणसिंग रजपुतसिंग दुधाणी (वय 20, रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मावळ तालुक्‍यातील पिगरी फॉर्म बेबेडोव्होळ येथे 29 मार्च 2018 रोजी दुपरी 3.30 ते 4 या दरम्यान ही घटना घडली. याबाबत वसंत सुरेश फुलवर (वय 17, रा. वडगाव सहाने, ता. जुन्नर) याने तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेच्या वेळी फिर्यादी आणि त्याचा मित्र फार्मवर होते. त्यावेळी भोंड आणि इतर साथीदारांनी मिळून तेथे जावून दोघांना चाकु आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांचाकडील मोबाईल आणि 40 विलायती डुकरे असा एकुण 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यापैकी 17 डुकरे आरोपींकडे पोलिसांनी केलेल्या तपासात मिळून आलेली आहेत. या प्रकरणात 8 मे 2018 रोजी भोंड याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. इतर आरोपींपैकी काही त्याचे नातेवाईक आहेत. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन असल्याचा दावा त्याने न्यायालयात केला होता. सरकारी वकील बोंबटकर यांनी केलेल्या युक्तीवादानंतर आणि त्यांनी दिलेल्या पुराव्यानंतर हा अर्ज फेटाळला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here