मोदींना पत्र पाठवून मंजुरी न देण्याची विनंती
नवी दिल्ली-दिल्ली मेट्रोतून महिलांना मोफत प्रवास करू देण्याची योजना आप सरकारच्या अजेंड्यावर आहे. मात्र, मेट्रोमॅन अशी ओळख असणाऱ्या ई.श्रीधरन यांनी त्या योजनेला विरोध दर्शवला आहे. त्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्या योजनेला मंजुरी न देण्याची विनंती श्रीधरन यांनी केली आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (डीएमआरसी) माजी प्रमुख असणाऱ्या श्रीधरन यांनी मोफत प्रवासाच्या योजनेमुळे धोकादायक पायंडा पडण्याचा इशारा दिला आहे. महिला प्रवाशांना मदत करण्याची आप सरकारची इच्छा असेल; तर प्रवास मोफत करण्याऐवजी महिलांना थेट खर्चाची रक्कम दिली जावी.मोफत प्रवासाचा पायंडा देशातील इतर मेट्रोंसाठीही पडेल. दिल्ली मेट्रो हा केंद्र आणि दिल्ली सरकारांचा संयुक्त प्रकल्प आहे.
त्यामुळे दिल्ली मेट्रोला दिवाळखोरीत आणणारा एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकत नाही, अशी भूमिका श्रीधरन यांनी मांडली आहे. दिल्ली मेट्रोच्या पहिल्या सेक्शनच्या उद्धाटनासाठी जाताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही तिकीट खरेदी केले होते. आताही ड्युटीवर असतानाही दिल्ली मेट्रोचे प्रमुख आणि इतर अधिकारी-कर्मचारी पैसे देऊन तिकीट घेतात, याकडेही श्रीधरन यांनी लक्ष वेधले आहे.