“प्रधानसेवक’ कसा असावा याचा निर्णय देशाला घ्यायचा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याप्रमाणे कष्ट करावेत

विरोधकांना एकाच घराण्याच्या सुरक्षेची चिंता

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मजबूर’ सरकारसाठी विरोधकांचे प्रयत्न पण भाजप “मजबूत’सरकार देणार

नवी दिल्ली: देशाचा पुढील “प्रधानसेवक’ प्रामाणिक आणि कष्टाळू असावा का गरज असेल तेंव्हा सुटीवर गेलेला आणि भ्रष्टाचारी असावा, याचा निर्णय देशवासियांना घ्यायचा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मोदी बोलत होते.

विरोधकांवर विशेषतः कॉंग्रेसवर टीका करण्यात मोदी यांनी कोणतीही कसर सोडली नाही. भ्रष्टाचार करण्यासाठी “मजबूर'(असहाय) सरकार सत्तेत यावे म्हणून विरोधक एकत्र येत आहेत. तर जनतेला “मजबूत’ (सक्षम) सरकार हवे आहे. असे मजबूत सरकार भाजपच देऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांची महाआघाडी म्हणजे भारताच्या राजकारणातील अपयशी झालेला प्रयोग आहे. या प्रयोगाला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.

“चौकीदारा’च्या भीतीमुळे काळ पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात देशाच्या राजकारणामध्ये एक मंथन सुरु झाले आहे. सर्वच विरोधक एकाच व्यक्‍तीविरोधात एकत्र यायला लागले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. समाजवादी पार्टी आणि बसपा हे दोनदशकांपासूनचे एकमेकांचे कट्टर विरोधी पक्ष लोकसभेसाठी एकत्र आल्याच्या पार्श्‍वभुमीवर ते बोलत होते.

आपल्या भाषणात मोदींनी विकासाच्या अजेंड्यावर विशेष भर दिला. राममंदिरासाठी कॉंग्रेसमुळे विलंब झाल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही, असे देशाच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. आता कसा “प्रधानसेवक’निवडायचा, याचा निर्णय देशाला घ्यायचा आहे. विरोधक कोणत्याही किंमतीत केवळ एकाच घराण्याचा बचाव करू पहात आहेत. मात्र जामिनावर असलेल्या या कुटुंबाला देशाबाबत कोणताही आदर नाही. मात्र भाजपचा राज्यघटनेवर विश्‍वास आहे, असे मोदी म्हणाले.

कॉंग्रेसने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सीबीआयला तपास करण्याची परवानगी नाकारल्याबाबतही मोदी यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना “युपीए’सरकारने आपल्याला तुरुंगात टाकण्यासाठी सर्व केंद्रीय संस्था कामाला लावल्या होत्या. गुजरातमधील तत्कालिन मंत्री अमित शहा यांनाही तुरुंगात टाकले होते. मात्र शहा यांनी चौकशीला सहकार्य केले होते. “युपीए’कडून कितीही त्रास दिला गेला तरी आपण मात्र “सीबीआय’ला प्रवेशबंदी केली नव्हती. याची मोदींनी आठवण करून दिली.

आपल्या सरकारने सर्वकाही साध्य केल्याचा दावा आपण करणार नाही. मात्र समाजातील सर्व गटांसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. सर्वसाधारण खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागासांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे नवभारतामध्ये आत्मविश्‍वास वाढीस लागेल, असेही मोदी म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हुरळून जाऊ नये, असा इशाराही मोदी यांनी दिला. शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट करावे. पक्षाला मिळालेले यश सामुदायिक कष्टातून मिळालेले आहे, हे लक्षात ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

सेवक कसा असावा.
घरातील व्यक्‍तींमध्ये भांडणे लावणारा, घरातील वस्तूंची चोरी करून नातेवाईकांमध्ये वाटप करणारा, गरजेच्यावेळी सुटीवर निघून जाणारा, घरातील भानगडींबाबत शेजाऱ्यांना माहिती सांगणारा आणि ज्याचा ठावठिकाणा कोणालाही माहिती नसतो, असा सेवक कोणाला हवा असेल का ? असा प्रश्‍न पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विदेशात सुटीवर जाण्यावर भाजपकडून नेहमीच टीका केली गेली आहे. या सर्व प्रश्‍नांचा रोख राहुल गांधी यांच्याकडेच होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)