कोणत्याही संस्थेपेक्षा देश मोठा – अरुण जेटली

-रिझर्व्ह बॅंकेकडे वेळोवेळी विचारणा करण्यात काहीच गैर नाही

-बाजारपेठेला भांडवलाशिवाय कुपोषित कसे ठेवणार

नवी दिल्ली – देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ज्या गोष्टी आवश्‍यक आहेत त्याबाबत केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे वेळोवेळी विचारणा केली आहे, यात गैर असे काहीही नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, विविध क्षेत्रासाठी कार्यरत संस्था महत्त्वाच्या आहेत. मात्र, यापेक्षा जास्त महत्त्वाचे देशाचे हित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी भांडवल सुलभता महत्त्वाची आहे. उद्योगांना आणि नागरिकांना पुरेसे भांडवल मिळाले तरच अर्थव्यवस्था वेगाने वाढू शकेल. त्यामुळे हे मुद्दे केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे वेळोवेळी मांडले आहेत.

ग्लोबल बिझनेस समिट या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत स्थिर आणि मजबूत सरकार केंद्रात होते. त्यामुळे देशासाठी आवश्‍यक निर्णय केंद्र सरकार घेऊन त्याची अंमलबजावणी करू शकले. त्यामुळे आगामी काळातही देशात स्थिर आणि मजबूत सरकार येण्याची गरज आहे. देशात पाच वर्ष स्थिर सरकारची गरज आहे. जर सहा महिन्याला सरकार बदलले तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. यापूर्वी देशात असा प्रसंग अनेक वेळा आला आहे. त्यामुळे त्यावेळी देशातील जनता पुन्हा अस्थिर सरकार निर्माण करणार नाही याची आपल्याला खात्री आहे, असे जेटली यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता तीन महिन्यांत निवडणुका होणार आहेत. त्यानंतर आणखी तीन महिने निवडणुकांनंतरचे घटनाक्रम होणार आहेत. त्यामुळे या काळात विविध पक्षांकडून मोठे मोठे अनाकलनीय दावे केले जाण्याची शक्‍यता आहे. लोकशाहीमध्ये असे प्रकार घडतात. मात्र, त्यानंतर दीर्घ पल्ल्यात देशासाठी योग्य त्याच बाबीचे कठोरपणे निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने ज्या नियमाचा कधीही वापर केल नाही त्या नियमाचा वापर करून रिझर्व्ह बॅंकेला काही विषयावर सरकारबरोबर चर्चा करायला भाग पाडले याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता जेटली म्हणाले की, यात वावगे असे काहीच नाही.

स्वातंत्र्यानंतर अनेकवेळा केंद्र सरकारचे रिझर्व्ह बॅंकेबरोबर काही वेळा मतभेद झालेले आहेत. त्यामुळे आताही काही मुद्द्यावर केंद्र सरकारचे रिझर्व्ह बॅंकेबरोबर मतभेद होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने कोणत्याही गव्हर्नरला राजीनामा देण्यास भाग पाडलेले नाही. याअगोदर चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांचे दोन गव्हर्नरबरोबर बोलणे बंद झाले होते याची आठवण जेटली यांनी करून दिली. जेटली म्हणाले की, देशाच्या आर्थिक हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काही मुद्द्यावर रिझर्व्ह बॅंकेबरोबर आग्रही चर्चा करण्यात काहीही चूक नाही. शेवटी देश हा देशातील संस्थेपेक्षा मोठा असतो हे विसरून चालणार नाही. किंबहूना सरकारसुध्दा देशापेक्षा मोठे नसते, असे जेटली म्हणाले.

ते म्हणाले की, तुम्ही बाजारपेठेला भांडवलाशिवाय कुपोषित ठेवू शकणार नाही. भांडवलसुलभतेकडे दुर्लक्ष केले तर केवळ उद्योग आणि अर्थव्यवस्थेवरच नाही तर सामान्य जनतेवरही त्याचा परिणाम होतो. उद्योग वाढले नाहीत तर त्याचा रोजगार निर्मितीवर परिणाम होईल. या बाबी जनतेने निवडून दिलेल्या सरकारला विचारात घ्याव्या लागतात. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने केवळ लोकांना आवडतील असे निर्णय न घेता आर्थिक शिस्तीसाठी आवश्‍यक असे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे स्थूल अर्थव्यवस्थेच्या अनेक बाबी मजबूत आहेत त्याची दखल जागतिक वित्तसंस्थांनी घेतली असल्याचा दावा जेटली यांनी केला.

आता निवडणुकांनंतर पुन्हा पाच वर्षांसाठी नवे मजबूत सरकार येण्याची गरज आहे. तरच देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारे निर्णय भावी सरकार घेऊ शकणार आहे. भारतातील लोक आशावादी आहेत. त्यांना जगाच्या बरोबरीने विविध क्षेत्रात विकास करायचा आहे. त्यासाठी राजकीय स्थिरता असण्याची गरज आहे याची जाणीव लोकांना आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात लोक स्थिर सरकार निर्माण कसे होईल या पद्धतीने मतदान करतील असा दावा त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण झाले आहे.

त्याचबरोबर कर भरणाऱ्यांची संख्या आणि कराचा भरणाही वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी देशाचा अर्थसंकल्प केवळ 14 लाख कोटी रुपयांचा होता तो आता 27 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. जर स्थिर सरकार आले तर हा अर्थसंकल्प आणखी दहा ते पंधरा लाख कोटी रुपयांनी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन ते चार महिन्यांत निवडणुकांमुळे बरेच दावे-प्रतिदावे केले जातील. मात्र, निवडणुकांचा धुराळा संपल्यानंतर दीर्घ पल्ल्यात उपयोगी धोरणे तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)