कृष्णा नदीत जलपर्णीसह प्लस्टिक पिशव्यांचा खच

वाई – वाईतील कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली असून शहराच्या विविध ठिकाणाहून येणाऱ्या सांडपाण्यातून प्लॅस्टिक कचरा जास्त प्रमाणात येत असल्याने नदी पात्रात प्लॅस्टिकचा ढीग पडला आहे. तसेच दोन्ही बाजूने सांडपाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा नदीचे पावित्र्य नष्ट होत असून कृष्णा नदीच्या स्वच्छतेलाच आव्हान मिळत आहे. क्षेत्रमहाबळेश्‍वरच्या कुशीत उगम पावलेली कृष्णा नदी दक्षिणकाशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.

नदीपात्रात सर्वच ठिकाणी सांडपाणी सोडल्याने तिचे पावित्र्य नष्ट होत असून याला प्रशासनासह नागरिक तेवढेच जबाबदार आहेत. वाई शहरात घरातील सर्वच कामे (धुणीभांडी, कपडे, आंघोळ) कृष्णेच्या तीरी जावून करण्याची जणू पारंपरिक प्रथाच आहे. ही प्रथा जपण्यासाठी कृष्णा नदीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे वाईकरांच्या लक्षातच येवू नये यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

कृष्णा स्वच्छतेसाठी समाजातील काही संस्थांनी आपली कंबर कसली आहे. या संस्था सुध्दा एकाच बाजूची स्वच्छता करीत असल्याने दुसऱ्याबाजूने नदीपात्रात डायरेक्‍ट सांडपाणी जात असल्याने अनेक ठिकाणी जलपर्णीच्या वनस्पतीने डोके वर काढले आहे. त्यातच काही संस्थांनी नदी पात्रात काम करण्यात येवू नये यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखलकर्ते राहतात पुण्यात कळवळा मात्र वाईतील कृष्णा नदीचा, त्यातच जलपर्णीची त्सुनामी कधी नदी पात्र काबीज करेल याची शाश्‍वती देता येत नाही. त्यात जी संस्था नदी स्वच्छतेचे काम करते ते सदस्य संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामावर मर्यादा पडत आहेत. स्वच्छतेच्या कामात वाई करांचा शून्य प्रतिसाद मिळत असल्याचे कृष्णा नदीच्या स्वच्छतेचे आवाहन निर्माण झाले आहे.

संथ वाहणारे पाणी व सांडपाणी हे त्याचे मुख्य खाद्य असल्याने जलपर्णीची वाढ झपाट्याने होते. जलपर्णीच्या त्सुनामीचा धोका निर्माण झाल्याने कृष्णा नदीच्या स्वच्छतेबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत पालिका प्रशासनाची भूमिका येरे माझ्या मागल्या अशी काहीशी अवस्था झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. प्लॅस्टिक हटाव मोहीम तर फक्त कागदोपत्रीच दिसत असून पालिका प्रशासनाचा निव्वळ दिखावा चालू असून ही मोहीम पूर्णपणे थंड पडल्याचे चित्र सध्या वाई शहरात दुर्दैवाने दिसत आहे.

पालिका प्रशासनाच्या स्वच्छतेविषयी कामाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. पालिकेकडे कर्मचारी संख्या मर्यादित असल्याने कृष्णा नदीच्या स्वच्छतेबरोबर अवाढव्य जलपर्णीच्या त्सुनामीपुढे पालिका प्रशासनाचा एकट्याचा टिकाव लागू शकत नाही हे सत्य नाकारता येत नाही. त्यासाठी समाजातील सर्व सामाजिक संस्था, व नागरिकांनी एकत्रित येवून पालिका प्रशासनाला सहकार्य केल्यास सर्वांच्या एकोप्याने कृष्णा नदी स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)