कॉंग्रेसला माणसे सांभाळता आली नाहीत – भानुदास बेरड

विखेंच्या प्रवेशामुळे युतीची ताकद वाढली ; युतीची आज नगरमध्ये बैठक

नगर: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या प्रवेशातून पक्षश्रेष्ठींनी राज्याला वेगळा संदेश या निमित्ताने दिली आहे. तो म्हणजे कॉंग्रेसला माणसे संभाळता आली नाही.

त्यामुळे राज्यात कॉंग्रेसची नाचक्की झाली आहे. विखेंच्या प्रवेशामुळे भाजपबरोबर शिवसेना युतीचीच ताकद वाढली असून लोकसभेबरोबर विधानसभेला देखील त्यांचा फायदा होणार असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले.

विखेंच्या प्रवेशानंतर भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बेरड यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे, माजी शहरजिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर, नगरसेवक भय्या गंधे, युवराज पोटे आदी उपस्थित होते. बेरड म्हणाले, भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पक्षाने घेतलेला निर्णय व आदेशाचे पालन करण्याची भूमिका घेतली आहे. पक्षश्रेष्ठींनी पक्षाचे हित लक्षात घेवून निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्वजण पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करणार आहे.

लोकसभेसाठी मी देखील इच्छुक होते. पण आता निर्णय झाला आहे. निर्णय होण्यापूर्वी इच्छा व्यक्‍त केली होती. पण आता पक्षाने उमेदवार दिल्याने मी नाराज नाही असे सांगून बेरड म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी राज्यात दिलेला संदेश हा महत्वाचा आहे. तो नेते व कार्यकर्त्यांना पटल्याने आता सर्वजण विखेंचे काम करीत आहेत. उद्या (रविवारी) सकाळी 10.30 वाजता येथील संजोग हॉटल येथे शिवसेना व भाजप युतीची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपसह शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तालुकानिहाय मेळावे, बैठकांसह निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप हे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई असले तरी ते पक्षासाठी प्रामाणिक आहेत. गेल्या साडेनऊ वर्षापासून ते पक्षात काम करीत आहे. त्यामुळे त्यांना भाजप काय आहे हे माहिती असल्याने ते पक्षाशी प्रामाणिक राहून उमेदवारासाठी काम करतील. उद्या बैठकीला निवडणुकीची रणनिती ठरवितांना ते उपस्थित राहणार असून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात येणार आहे. असे बेरड म्हणाले. भाजपचे कार्यालय बंद असल्याबद्दल बेरड म्हणाले, सध्या तरी कार्यालय बंद असले तरी ते येत्या दोन दिवसात उघडण्यात येईल.


मी नगरमध्ये यापूर्वीच पोहोचलो

नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात डॉ. विखे यांची गाडी राहुरीच्या पुढेच येवू देणार नाही. असा देण्यात आलेल्या इशाऱ्यावर यावेळी डॉ. विखे म्हणाले, त्यांनी काय गाडी अडवावी, मी तर यापूर्वीच राहूरीच्या पुढे नगरला येवून पोहोचलो आहे. त्यांच्या आरोप व टिकेला वेगळ आल्यावर उत्तर देईल. असे डॉ. विखे म्हणाले.


पाठिंबा काढल्यानंतर पाहू

महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर झाला आहे. भाजपने पाठिंबा मागितला नव्हता. कोण पाठिंबा देवून सत्ता मिळणार असले तर तो पाठिंबा का घेवून नये, राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर पाहू आता शिवसेना व भाजप युती झाली आहे. त्यामुळे पाठिंबा काढला तरी काहीच फरक पडणार नाही. असे बेरड म्हणाले.


निर्णयाचे पालन करा

डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी लोकसभा निवडणूकीबाबत भूमिका ठरविण्यासाठी उद्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यावर ऍड. अभय आगरकर म्हणाले की, भूमिका काय ठरवता, पक्षाने निर्णय घेतला असल्याने आता त्याचे पालन करा असा टोला त्यांनी खा. गांधी यांना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)