पुणे जि.प.तील ग्रंथालयाची अवस्था दयनीय

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वीरधवल जगदाळे यांचा आरोप

पुणे – ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्हा परिषदेतील ग्रंथालयाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. पुस्तके ठेवण्यासाठी रॅकची कमतरता असून गेल्या अनेक वर्षांत नवीन पुस्तकांची खरेदी झाली नाही. या ग्रंथालयाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सर्वसाधारण सभेत केला. या ग्रंथालयाची जुनी ओळख टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी पूर्णवेळ ग्रंथपाल असावा, वेळच्या वेळी स्वच्छता व्हावी, नवीन पुस्तके आणि फर्निचर करण्यात यावे, अशी मागणी जगदाळे यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या ग्रंथालयात 24 हजारांहून अधिक पुस्तकांचा खजिना आहे. जुन्या इमारतीमध्ये याठिकाणी वाचकांची गर्दी अधिक असयायची. मात्र, सध्या नवीन इमारतीमध्ये आलेल्यावर त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अनेकांना ग्रंथालय आहे, हे देखील माहित नाही. या ग्रंथालयाचे 600 हून अधिक सभासद आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी आणि बाहेरच्या व्यक्तींचा समावेश आहे. आजही काही सभासद नियमित पुस्तके घेतात, वर्तमानपत्र वाचतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत नवीन पुस्तकांची खरेदीच झाली नाही. बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. निधीही दिला जात नाही. त्यामुळे सभासदांची संख्या कमी होत असून या ऐतिहासिक ग्रंथालयाचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सदस्य वीरधवल जगदाळे, प्रमोद काकडे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतील ग्रंथालयासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा. त्याठिकाणी स्वछता, फर्निचर करून पुस्तकांची खरेदी व्हावी. तसेच उपलब्ध पुस्तकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी संगणकीय सुविधा उपलब्ध व्हावी. याठिकाणी पूर्णवेळ ग्रंथपालाची नेमणूक व्हावी जेणेकरून वाचनाची आवड निर्माण होईल.
– वीरधवल जगदाळे, सदस्य जिल्हा परिषद पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)