पुणे – आयुक्त साहेब, जरा इकडेही लक्ष द्या!

प्रभात विशेष
पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचा धंदा जोमात
चांगले पेव्हिंग ब्लॉक केले जाताहेत रातोरात गायब

पुणे – नगरसेवकांकडून वॉर्डस्तरीय निधी दि.31 मार्चपूर्वी खर्ची पाडण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू करण्यात आल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी येथे पदपथावर वर्षभरापूर्वी बसविलेले चांगल्या स्थितीतील पेव्हिंग ब्लॉक रातोरात गायब करून नवीन ब्लॉक बसविण्यात आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनीही दखल न घेतल्याने हे अनावश्‍यक सुरू असलेले काम रातोरात पूर्ण करण्यात आले आहे.

बिबवेवाडी येथील येथील सुगंधा लॉन्स परिसरात राज्य सोसायटीमधील पूनम पार्कच्या परिसरात एमएनजीएल गॅस वाहिनीसाठी खोदाई करण्यात आली होती. यासाठी पेव्हिंग ब्लॉकच्या दोन रांगा उकरण्यात आल्या. काम झाल्यानंतर एनएनजीएलने हे ब्लॉक पुन्हा बसवून पदपथ पूर्वीप्रमाणे करणे अपेक्षित होते. मात्र, या खोदाईचा गैरवापर करत महापालिकेने चक्क हा पदपथ दुरूस्त करण्याच्या नावाखाली थेट नवीन पेव्हिंग ब्लॉक मागविले. तसेच रातोरात हे ब्लॉक बदलण्याचे कामही हाती घेण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी हा प्रकार आयुक्तांना कळविला. त्यानंतर हे काम थांबविण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी अचानक हे काम पुन्हा सुरू करून बहुतांश ठिकाणी पुन्हा ब्लॉक बसविण्यात आले.


उद्देशालाच हरताळ
पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यामागे प्रमुख दोन उद्देश आहेत. हे ब्लॉक एकमेकांमध्ये गुंतविता येत असल्याने काही खोदाई करायची झाल्यास ते सहज काढता येतात. तसेच पुन्हा आहे तसे बसविता येतात. याशिवाय, अशा ब्लॉकमध्ये जोडणीनंतर काही जागा शिल्लक राहत असल्याने त्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. तर रहदारीच्या प्रमाणानुसार, हे ब्लॉक किमान तीन ते पाच वर्षे सुस्थितीत राहतात. पण, या सर्वच उद्देशांना हरताळ फासला जात आहे. खोदाईसाठी ब्लॉक काढल्यानंतर ते फेकून दिले जातात. रिकाम्या जागेत सिमेंट भरले जाते. तर ब्लॉक बसविताना त्यात फट ठेवण्याऐवजी ते सिमेंटने जोडले जातात. त्यामुळे पावसाचे पाणी मुरण्याचा उद्देशच असफल होतो. त्यामुळे ब्लॉकच्या आयुर्मानाचा विचार न करताच दरवर्षी ते बदलून पैशांची उधळपट्टीसुरूच आहे.

पेव्हिंग ब्लॉकचा प्रकार धक्कादायक आहे. मार्च अखेर लक्षात घेऊन शहरात पेव्हिंग ब्लॉकचे काम सुरू आहे. हे ब्लॉक कधी बसविण्यात आले, त्याची मुदत किती, याचे कोणतेही ऑडिट होत नाही. खोदाईसाठी हे ब्लॉक काढल्यानंतर ते पुन्हा बसविता येत असता. तरीही, नवीन ब्लॉक बसविले जात आहेत. हे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी व्हावी.
– संजय शितोळे, सिटी आय संस्था.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)