सातारा अन्‌ माढ्यात कॉंटे की टक्कर

दिग्गज उमेदवारांमुळे होणार चुरशीचा सामना : मतदानासाठी कार्यकर्ते सज्ज

सातारा – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे काटें की टक्कर होताना दिसून येत आहे. साहजिकच त्यामुळे कायकर्त्यांमध्ये कमालीचा जोश निर्माण झाला असून मंगळवारी अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मागील लढत एकतर्फी झाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार खा.उदयनराजे यांच्या विरोधात भाजप-सेनेने माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना रणांगणात उतरविले आहे. विशेष बाब म्हणजे, पाटील यांच्या शिवसेनेतून उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा अन कोरेगाव येथे जाहीर सभा देखील घेतली. तर दुसऱ्या बाजूला खा.उदयनराजे यांच्यासाठी खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतली.

नरेंद्र पाटील यांच्यासाठी ना.चंद्रकांत पाटील, ना. शेखर चरेगावकर, विक्रम पावस्कर यांच्यासह सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा धावता दौरा झाल्याचे दिसून आले. तर खा. उदयनराजे यांच्यासाठी आ.शशिकांत शिंदे यांच्यासह उर्वरित विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी धावपळ करताना दिसून आले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्याचे उमेदवार सहदेव ऐवळे तर माढ्यातील उमेदवार विजय मोरे यांच्रया प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील कराड आणि फलटण येथे सभा घेतली.

अपक्ष उमेदवार पंजाबराव पाटील, शैलेंद्र वीर यांच्यासह इतर उमेदवारांनी देखील पदयात्रा तसेच सोशल मीडियाद्वारे मतदारांशी संपर्क साधला. यंदा माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी या मतदारसंघात निवडणूक लढविण्याची घोषणा केली मात्र, नंतर यु टर्न घेतला. त्यामुळे ह्या विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरू आहे. दरम्यान, नाट्यमय पक्षांतर आणि पाठिंब्यावरून देखील माढा मतदारसंघ राज्यातील वृत्तवाहिन्यांचा हेडलाईनचा मुद्दा ठरला. ऐनेवळी अकलूजच्या मोहिते-पाटीलांनी भाजपात प्रवेश करून माढ्याचा तिढा सोडविण्याची वाट मोकळी करून दिली.

त्यापाठोपाठ संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत तर रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी प्राप्त केली. शिंदे यांच्यासाठी खा. शरद पवार, आ. छगन भुजबळ, ना. रामराजे ना. निंबाळकर आणि आ. गणपतराव देशमुख, आ.बबनराव शिंदे यांनी ठिकठीकाणी सभा घेतल्या. तर भाजपने खुद्द पंतप्रधानांना अकलूज येथे निमंत्रित करून घेतलेली सभा देखील चांगलीच चर्चेत राहिली.

होम पीचवर मताधिक्‍क्‍यासाठी प्रयत्न

सातारा व माढा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे, दोन्ही मतदारसंघातील दिग्गज उमेदवार स्वतंत्र विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे खा. उदयनराजे यांना साताऱ्यातून तर नरेंद्र पाटील यांना पाटणमधून मताधिक्‍क्‍य देण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येतील. त्याचबरोबर माढा मतदारसंघात रणजितसिंह ना. निंबाळकर यांना फलटणमधून तर संजय शिंदे यांना माढा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍क्‍य देण्यावर जोर असल्याचे दिसून येत आहे. सर्व प्रक्रियेत उर्वरित विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या भूमिकेवरच निकाल अवलंबून असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)