भारतात कोणत्या तुरुंगात ठेवणार याची माहिती मागवली
लंडन- फरार हिरे व्यवसायिक नीरव मोदी याच्या कोठडीला लंडनमधील कोर्टाने 27 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेतील 2 अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत ही सुनावणी लंडनमधील न्यायालयात सुरू आहे. नीरव मोदीने जामीनासाठी तिसऱ्यांदा केलेला अर्ज या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या सुनावणीच्यावेळीही फेटाळण्यात आला होता. तेंव्हापासून त्याला दक्षिण-पश्चिम लंडनमधील वॅन्ड्सवर्थ येथील कारागृहामध्ये ठेवण्यात आले आहे. त्याला आज आर्थबटनॉट यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तेंव्हा न्यायालयाने त्याला 27 जूनपर्यंतची कोठडी सुनावली.
नीरव मोदीला भारतात कोणत्या तुरुंगात ठेवले जाणार आहे, याची माहिती 14 दिवसात देण्याची सूचनाही न्यायालयाने भारत सरकारला केली आहे.
नीरव मोदीला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली होती. नीरव मोदीने 19 मार्चला नवीन खाते उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात लंडनमधील मेट्रो बॅंकेच्या माध्यमातून प्रत्यार्पणासाठीचे वॉरंट बजावण्यात आले होते. तेंव्हापासून तो तुरुंगातच आहे.