सासवड – शहरातील चोऱ्यांचे वाढते प्रमाण ही शहरातील नागरिकांची डोकदुखी बनली आहे. फ्लॅट, दुकाने, घरफोडीचे प्रकार नित्याचेच झाले असताना आता चोरट्यांनी दवाखाने लक्ष केले आहेत. शहरातील एका दवाखान्यातून 1 लाख 65 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. अमोल पांडुरंग अनुगडे (वय 40, रा. पर्वती, पुणे) यांनी फिर्याद दिली. सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथे डॉ. अनुगडे यांचे ओम डेन्टल क्लिनिक आहे. (दि.11) रात्री आठ ते (दि. 12) जुलै सकाळी दहाच्या या कालावधीत चोरट्यांनी क्लिनीकचे कुलूप तोडून तब्बल 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल पळविला. यात 20 हजार रुपयांचा लॅपटॉप, डिजीटल एक्स- रे मशीन, ऍन्टोग्राफी एचपी मशीन, रोटरी फाईल्सचे 12 ते 15 पॅकेट, 800 रोकड, असा एकूण 1 लाख 65 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सासवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.