मुख्यमंत्र्यानी घेतली कारण ससाणेंची भेट

उत्तरेत राजकीय उलथापालथ होण्याची शक्‍यता
श्रीरामपुरात कॉंग्रेसला खिंडार पडण्याची शक्‍यता

नगर – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज श्रीरामपूरमध्ये आले असता त्यांनी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या करण ससाणे यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसह ससाणे यांनी ही एक सदिच्छा भेट होती, असे सांगून भेटीचा तपशील देण्यास नकार दिला. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांचा विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीमान्यासह ससाणे यांचाही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी स्वीकारल्यानंतर आज लगेच ससाणे यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने श्रीरामपूरात कॉंग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

22 दिवसांपूर्वीच ससाणे यांची कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीमाना दिला. गुरुवारी सकाळी ससाणे समर्थकांची बैठक झाल्यानंतर दुपारी ससाणे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यावेळी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांनी माझे वडील कै. जयंत ससाणे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द प्रयोग केल्याने त्यांचा प्रचार करण्याची इच्छा राहिली नाही. पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याने पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणे योग्य नाही. म्हणून या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात ससाणे व आ. कांबळे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

हे दोघेही राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक आहे. परंतु विखेंची कोंडी करण्याच्या हेतूने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आ. कांबळेंना लोकसभा उमेदवारी तर ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्‍ती केली होती. परंतू विखेंनी आता हा डाव परतून लावला आहे. वडाळा महादेव येथे बुधवारी ससाणे समर्थकांची बैठक घेवून कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी करण ससाणे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विखेंनी पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.

गुरुवारी विखेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतर उत्तरेत राजकीय हालचालींना वेग आहे. त्यातून आज थेट मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी करण ससाणे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. अर्थात यावेळी विखे देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ते आले नाहीत. प्रचार सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ससाणे यांची भेट घेवून चर्चा केली. अर्थात ससाणे हे कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवाराला मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली असल्याची शक्‍यता आहे. मात्र या भेटीमुळे श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)