साने-शेडगे यांच्यात अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून आरोपांच्या फैरी

पिंपरी – अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजप नगरसेविका आशा शेडगे यांच्यात आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. साने यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शेडगे यांनी विकाऊ लोकांच्या सांगण्यावरून विनाकारण शंका उपस्थित करू नये, असा साने यांच्यावर पलटवार केला आहे.

दत्ता साने यांनी महापालिका आयुक्‍तांना याबाबतचे निवेदन दिले आहे. या निवेदनात आशा शेडगे यांचा नामोल्लेख टाळत साने यांनी आरोप केले होते. निवेदनात म्हटले होते की, एका नगरसेविकेशी संबंधित असलेल्या खाजगी मंडळामार्फत पालिकेच्या निधीमधून हे मंडळ खाजगी कार्यक्रम राबवत आहे. या संस्थेला शहरातील धनगर समाजाचा प्रचंड विरोध आहे.

या विरोधामुळे मागील वर्षापासून अहिल्यादेवी होळकर जयंतीचे दोन वेगवेगळे कार्यक्रम करण्यात आले आहेत. विद्यमान नगरसेविका मंडळाच्या अध्यक्षा असतील, तर त्या मंडळाला पालिकेच्या वतीने निधी उपलब्ध करुन देणे घटनाबाह्य असून, तो कायदेशीर गुन्हा असून या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी व नगरसेविका अडचणीत येऊ शकतात. हे मंडळ धर्मदाय आयुक्तांकडे नोदंणीकृत आहे काय व त्यांचे लेखापरीक्षण वेळच्या वेळी झाले आहे काय?, झाले असल्यास त्यांचीही एक प्रत देण्यात यावी. तसेच मनपाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जंयती साजरी केलेल्या मागील पाच वर्षाच्या संपूर्ण खर्चाची माहिती मागणी करुनही मिळालेली नाही, तीही त्वरीत देण्यात यावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करु, असा पवित्रा घेतला होता.

या आरोपाला प्रत्युत्तर देताना आशा शेडगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, अहिल्यादेवी यांच्या जयंतीवर महापालिकेकडून होणाऱ्या खर्चाबाबत शंका उपस्थित करून, साने यांनी जयंती कार्यक्रमाला एक प्रकारे विरोधच केला आहे. त्यामुळे दत्ता साने यांचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. संस्थेची धर्मादाय आयुक्‍त यांच्याकडे नोंदणी झालेली आहे. जयंती कार्यक्रमांसाठी महापालिकेने संबंधित संस्थेला एक रुपया तरी दिल्याचे पुरावे साने यांनी द्यावेत. अन्यथा शहरातील धनगर बांधवांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनांनी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे. तसेच, पालिका अहिल्यादेवी जयंती कार्यक्रम एका खासगी मंडळामार्फत नव्हे, तर सर्व धनगर बांधवांशी चर्चा करून आयोजित करत असते, असे पत्रकात नमूद केले आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर, अहिल्यादेवी उत्सव कमिटी पिंपरीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, ऑल इंडिया धनगर समाज या संघटनेचे अध्यक्ष दिपक भोजने, रुपीनगर येथील अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, सांगवी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष दादासाहेब चितळकर, थेरगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश पाडुळे यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)