भीमा कोरेगाव प्रकरणी 8 डिसेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करावे : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

नवी दिल्ली: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयामध्ये दाखल केलेले आरोपपत्र 8 डिसेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने ही सूचना केली आहे. या आरोपींवर पुण्याच्या विशेष न्यायालयात ठेवण्यात आलेले आरोप सर्वोच्च न्यायालयाला माहीत व्हावेत यासाठी हे आरोपपत्र 8 डिसेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही दाखल करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे वकिल ऍड. मुकुल रोहतगी यांना केली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखांना अटक करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली.

-Ads-

भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांपेक्षा अधिक मुदत देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयालाही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्या. एस.के.कौल आणि न्या. के.एम.जोसेफ यांचाही सहभाग असलेल्या पिठाने हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती दिली आहे.

तत्पूर्वी भीमा कोरेगाव प्रकरणातील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापिठातील प्राध्यापक शोमा सेन, दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, कार्यकर्ते महेश राऊत आणि केरळच्या रहिवासी रोना विल्सन या आरोपींना महाराष्ट्र पोलिसांनी जून महिन्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधित कायद्यांतर्गत माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली होती. या अटकेमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. या अटकेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्‍त करण्याची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)