केंद्राने केली 24 हजार 503 कोटींची डाळ आणि तेलबियांची खरेदी

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आधारभूत किंमतीवर केंद्र सरकारने आत्तापर्यंत 52.83 लाख टन डाळी आणि तेलबियांची खरेदी केली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाने आज दिली. या खरेदीसाठी सरकारने 24 हजार 503 कोटी रूपयांची रक्कम खर्च केली आहे. डाळी आणि तेलबियांचे बाजारातील भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने किमान आधारभूत किंमतींच्या आधारे शेतकऱ्यांकडून ही खरेदी सुरू करावी अशी विनंती राज्य सरकारांनी केल्यानंतर केंद्र सरकारने ही खरेदी सुरू केली आहे.

सुमारे बारा राज्यांतून ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यात मध्यप्रदेशात सर्वाधिक म्हणजे 22.91 लाख टन, राजस्थानात 15.58 लाख टन आणि गुजरात मध्ये 4 लाख 60 हजार टन डाळी आणि तेलबियांची खरेदी आत्तापर्यंत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खरेदीचे प्रमाण 2.26 लाख टन इतके आहे. तर हरियानातील प्रमाण 2.30 लाख टन, कर्नाटकातील 1.64 लाख टन तेलंगणातील 1 लाख 7 हजार टन इतके आहे अशी माहितीही कृषी खात्यातर्फे देण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात तेलबिया आणि डाळींच्या उत्पादनांत मोठी वाढ झाली आहे. तेलबियांचे यंदाचे उत्पादन 22.18 दशलक्ष टन इतके झाले आहे गेल्या वर्षीै ते 20.99 दशलक्ष टन इतके झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)