चाऱ्याविना तडफडणाऱ्या जनावरांना छावणीचा आसरा

-माणदेशी फाउंडेशनचा पुढाकार
-साडेआठ हजारांहून अधिक जनावरांना मिळाला आधार

म्हसवड – माण तालुका हा तसा नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र याठिकाणी पडलेल्या दुष्काळाची छाया अधिक गडद आहे. यामुळे तालुक्‍यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अधारवड असलेले पशुधन दावणीवरच चाऱ्याविना हंबरडा फोडत असल्याची वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेले लाखमोलाचे हे पशुधन दुष्काळाचे बळी ठरू नयेत यासाठी म्हसवड शहरातील माणदेशी फाउंडेशनने बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने म्हसवड शहरातील मेघासिटी येथे जनावरांची चारा छावणी सुरू केली आहे.

जानेवारीपासून चेतना सिन्हा आणि विजय सिन्हा यांच्या माणदेश फाउंडेशनने सुरू केलेल्या चारा छावणीत साडे आठ हजारांहुन अधिक जनावरे दाखल झाली आहेत. जनावरांच्या देखभालीसाठी छावणीतच मुक्कामी रहात असलेल्या शेतकऱ्यांचीही काळजी फाउंडेशन घेत आहे. छावणीतील जनावरांना दररोज ऊस, मका, पेंड, मुर्गास आदी खाद्य दिले जात असून त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग आजार होवू नये, याकरीता फाऊंडेशनच्या वतीने छावणीतच जनावरांच्या डॉक्‍टरांचे एक पथक तैनात ठेवले आहे. तसेच शेतकऱ्यांचेही आरोग्य निरोगी रहावे यासाठी छावणीतच वैद्यकिय सेवा सेवा सुरू केली आहे.

राज्यातील जवळपास सर्वच तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी गंभीर स्वरुपाचा दुष्काळ शासनाने जाहीर केला आहे. माण तालुक्‍यात तर नेहमीच गंभीर दुष्काळ पडतो. येथे पाऊसच अत्यल्प पडत असल्याने नेहमीच दुष्काळ ठरलेला असतो. या दुष्काळाचा सामना करत येथील शेतकरी मोठ्या कष्टाने आपली शेती पिकवत आहेत. मात्र शेतातील मालाला सध्या योग्य भाव मिळत नसल्याने शेतीत होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणुन अनेक शेतकऱ्यांनी जनावरे पाळली आहेत. दुधाच्या पैशातून त्यांचे वार्षिक नियोजन सुरु आहे.

यंदा याठिकाणी पावसाने नेहमीप्रमाणे टांग दिल्याने नोव्हेंबर महिन्यात येथील पाण्याचे स्तोत्र आटु लागल्याचे चित्र तालुक्‍यात होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माण तालुक्‍यात जनावरांची चारा छावणी सुरु झाल्याने पुढील सहा-सात महिने कसे जाणार या विवंचनेत येथील शेतकरी आहेत. अवघ्या 20 दिवसांत चारा छावणीत साडेसात हजारहून अधिक लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. आगामी काळात हा आकडा नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)