भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प नागरिकांना, विकासाला अनुकूल

पंतप्रधान मोदी: गरिबांचे सबलीकरण होईल, तरूणांना चांगले भवितव्य मिळेल

नवी दिल्ली, दि.5 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव भारताच्या उभारणीसाठीचा अर्थसंकल्प अशा शब्दांत केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प नागरिकांना आणि विकासाला अनुकूल असा आहे. त्यामुळे गरिबांचे सबलीकरण होईल आणि तरूणांना चांगले भवितव्य उपलब्ध होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

संसदेत अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर मोदींनी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या भाषणातून त्यांची भावना व्यक्त केली. गरीब, शेतकरी, दलित आणि वंचित घटकांच्या सबलीकरणासाठी सर्वसमावेशक पाऊले उचलण्यात आली आहेत. सबलीकरणामुळे ते सर्व घटक आगामी पाच वर्षांत देशाचे शक्तिस्थान बनतील. त्या घटकांकडून 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ऊर्जा देशाला मिळेल, असे त्यांनी म्हटले. अर्थसंकल्प आशेने ओतप्रोत भरला आहे. त्यामुळे देशाच्या 21 व्या शतकातील विकासाला चालना मिळेल. उद्योगांना आणि उद्योजकांना मजबुती मिळेल. देशाच्या विकासातील महिलांचा सहभाग वाढेल. अर्थसंकल्पामुळे करप्रक्रिया सुलभ होईल.

तसेच, पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाला हातभार लागेल. विकासाला गती मिळून मध्यमवर्गाला मोठा लाभ मिळेल. कृषि क्षेत्राच्या आमूलाग्र परिवर्तनासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची रूपरेषा अर्थसंकल्पात अधोरेखित करण्यात आली आहे. पर्यावरणावर भर दिल्याने तो हरित अर्थसंकल्प ठरला आहे. एकूणच अर्थसंकल्पामुळे आत्मविश्‍वास उंचावेल, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)