वडिलांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील राहोली बु. येथे शेतीच्या वादातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली. शंकर लक्ष्मण डोरले (35) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गणेश डोरले, अंबादास घोंगडे, विठ्ठल घोंगडे, ज्ञानेश्वर बोरगड, मारोती डोरले, रामकिशन डोरले, नामदेव डोरले असे आरोपीची नावे आहेत. मृत शंकर डोरले आणि आरोपींमध्ये शेताचा धुरा काढल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की यात आरोपीने थेट शंकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने गंभीर वार केले. यात शंकर हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.
जखमी शंकर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांने तपासून मृत घोषित केले. शंकर डोरले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अंगद सुडके हे करीत आहेत.